संग्रहित फोटो
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. याच कालावधीत ”ड्रंक अँड ड्राइव्ह”वर विशेष लक्ष देऊन त्याविरोधात कडक आणि व्यापक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत.
शहरात येरवडा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि बाणेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पबची संख्या अधिक आहे. पब तसेच बारच्या परिसरात ३१ डिसेंबरच्या दिवशी हुल्लडबाजी होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याची सूचना संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे. या भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नाताळ, नववर्ष स्वागत, निवडणूक आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.
वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागात नाकाबंदी करून मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईला सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी रात्री ४० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर शनिवारी रात्रीत तब्बल १०२ जणांवर कारवाई झाली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. पुढील तीन दिवस आणखी तीव्रता वाढत मोठ्या संख्येने नाकाबंदी लाऊन कारवाई केली जाणार आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर देखील पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.






