संग्रहित फोटो
कल्याणी कोमकर हिने रविवारी पत्रकारांशी बोलताना ही मागणी केली आहे. आयुष कोमकर खून प्रकरणात म्होरक्या बंडू आंदेकरसह १५ जणांना अटक केली आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खूनात आयुषचे वडील गणेश कोमकर याला अटक झाली. नंतर वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणून आयुषनंतर कोंढव्यात गणेश काळे याचा खून झाला.
दरम्यान, सातत्याने निवडणूक लढवून आंदेकर कुटूंबातून दोघे नगरसेवक होतात. यंदा मात्र, कुटूंबच कारागृहात आहे. त्यामुळे ते निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु, आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांना विशेष न्यायालयाने महापालिका निवडणूक लढविण्यास परवानगी दिली. त्यानंतर बंडू आंदेकरसह भावजय व सून सोनाली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, यातही उमेदवारी अर्ज अधर्वट असल्याने ते स्विकारले गेले नाही. त्यामुळे ते पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी दाखल होणार असल्याचे समजते.
त्यात आता कल्याणी कोमकर पत्रकारांशी बोलताना म्हणाली, ‘आंदेकर कुटुंबीयांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास परवानगी दिली आहे. लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार) उमेदवारी देण्याचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आंदेकरांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देऊ नये, अशी विनंती मी अजित पवार यांच्याकडे करणार आहे.
बंडू आंदेकरला घोषणाबाजी न करता उमेदवाजी अर्ज दाखल करण्यास न्यायालायने परवानगी दिली होती. आंदेकरने घोषणाबाजी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या विरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे. आंदेकर यांनी मुद्दामाहून अर्ज चुकविला. आंदेकर यांना काही राजकीय पक्षाचे नेते मदत करत आहेत. त्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाच्या निषेधार्थ मी आंदोलन करणार आहे. वनराज आंदेकर माझा भाऊ होता. मी माझ्या भावाची सुपारी देऊन खून घडवून आणला, असा आरोप करण्यात आला. याप्रकरणाशी आमचा संबंध नाही. माझ्या मुलाचा खून आंदेकर टोळीने केला. आंदेकर टोळीने विजय निंबाळकर, निखील आखाडे, आयुष कोमकर, गणेश काळे यांचे खून केले’, असे तिने सांगितले.






