Bandu Andekar News: नाना पेठेतील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या घरावर बुधवारी (१० सप्टेंबर) पुणे पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांना सोनं, चांदी, रोकड तसेच विविध महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत. झडती सायंकाळी पाच वाजता सुरू होऊन गुरुवारी (दि. ११) पहाटे चार वाजेपर्यंत चालली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. आंदेकरने आपल्या घराच्या शंभर मीटर परिसरात तब्बल २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
५ सप्टेंबर रोजी आंदेकरची नातू आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात बंडू आंदेकरसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे. झडतीदरम्यान बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील तसेच वाडेकर कुटुंबीयांतील वृंदावनी, स्वराज व तुषार यांच्या घरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून २१ हजार रुपयांची रोकड, १६ मोबाईल फोन, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
तर बंडू आंदेकरच्या घरातून तब्बल ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने (ज्यांची किंमत सुमारे ८५ लाख रुपये आहे), ३१ हजार रुपयांची चांदी आणि २ लाख ४५ हजार रुपयांची रोकड पोलिसांच्या हाती लागली. आयुष कोमकर खूनप्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांनी तब्बल ११ तास धडक कारवाई केली आहे. या कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त केला. या झडतीत १० पेक्षा अधिक साठेखत, पॉवर ऑफ अॅटर्नी, बँकेची पासबुकं, विविध करारनामे, टॅक्स पावत्या, पेनड्राईव्ह तसेच एक कार पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. त्यांना पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख आणि पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी ही कारवाई केली आहे. बुधवारी या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे तपास सोपवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
आयुष कोमकर खूनप्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदाच बंडू आंदेकरच्या घरावर झडती घेतली. या झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त करण्यात आली असून तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुढील चौकशी सुरू आहे.