पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच... (File Photo : Escort Service)
पुणे : पोलिसांकडून वेश्याव्यवसायावर अनेकदा कारवाई केली जाते. त्यातच आता पुण्यात पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाई केली आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बाणेर व विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बाणेर आणि विमानतळ परिसरात छापेमारीत एकूण 18 मुलींची सुटका करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे यात 10 पेक्षा जास्त मुली परदेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिमंडळ 4 अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये, विमानतळ पोलिसांनी एका स्पा सेंटरवर छापा टाकून 16 मुलींची सुटका केली. त्यात 10 परदेशी आणि 2 भारतीय अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. याप्रकरणी बाणेर व विमानतळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यामध्ये स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागेचा मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
हेदेखील वाचा : Crime News : धक्कादायक! चेटकीन असल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं; अवशेष निर्जनस्थळी पुरले
दरम्यान, बाणेर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकत 2 मुलींची सुटका केली आहे. या ठिकाणीही मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होणार
मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय सुरू होता, यासाठी तरुणींना मोबदल्याचे आमिष दाखवून कामावर ठेवण्यात आले होते. काही पीडित तरुणींची परिस्थिती हलाखीची असून, त्यांना जबरदस्तीने व्यवसायात ढकलल्याचेही समोर आले आहे. विमानतळ आणि बाणेर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध पीटा, पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यात यापूर्वी झाली होती कारवाई
दुसऱ्या एका घटनेत, वडगावशेरी येथील एका कॉम्प्लेक्समध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी छापा कारवाई करून पर्दाफाश केला. पोलिसांनी कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका केली होती. तर ’स्पा’च्या मॅनेजरसह मालकावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस शिपाई वर्षा नामदेव सावंत यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर आता पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरात वेश्याव्यवसाय होत असल्याचे समोर आले आहे.