अंधश्रद्धेचा कळस! चेटकीन असल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं; अवशेष निर्जनस्थळी पुरले
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचं भीषण वास्तव समोर आलं आहे. एका कुटुंबातील तीन महिला आणि दोन पुरुष अशा पाच जणांना फक्त चेटकीन असल्याच्या संशयावरून जिवंत जाळण्यात आलं आहे. पूर्णिया जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेटगामा गावात ही घटना घडली असून शिल्लक अवशेष निर्जनस्थळी पुरण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृतांमध्ये सीता देवी (48), बाबूलाल उरांव (50), कातो देवी (65), मंजीत उरांव (25) आणि राणी देवी (23) यांचा समावेश आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील कातो देवी या वृद्ध महिलेवर काही गावकऱ्यांना ‘डायन’ असल्याचा संशय होता. या अंधश्रद्धेमुळे गावप्रमुख नकुल उरांव याच्या नेतृत्वाखाली रविवारी रात्री गावात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला सुमारे 200 लोक जमले होते. यावेळी संशयित डायन म्हणून कातो देवीला व तिच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आलं आणि त्यांच्यावर थेट हल्ला करण्यात आला.
मृत महिला कातो देवी यांचा नातू सोनू याने दिलेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि संपूर्ण कुटुंबावर लाठी-फटके आणि काठ्यांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर सर्वांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलं. या हल्ल्यात सोनूने मात्र कसाबसा जीव वाचवला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या भयानक घटनेनंतर आरोपींनी मृतदेह एका ट्रॅक्टरमध्ये टाकून गावापासून काही अंतरावर नेऊन पुरून टाकले. सोनूच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पूर्णिया एसपी स्वीटी सहरावत आणि एएसपी आलोक रंजन यांच्यासह तिन्ही पोलिस ठाण्यांचे अधिकारी तातडीने पोहोचले.
पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत गावप्रमुख नकुल उरांव आणि ट्रॅक्टर चालकाला अटक केली आहे. याशिवाय इतर आरोपींचा शोध घेण्याचा तपास सुरु आहे. आतापर्यंत तीन मृतदेह पोलिसांनी शोधून काढले असून उर्वरितांचे शोधकार्य सुरु आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबाच्या विनाशाची नसून, समाजात आजही पसरलेल्या अंधश्रद्धेची आणि सामूहिक हिंसेची भीषण उदाहरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात कडक कारवाई करून दोषींना कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
पूर्णिया जिल्ह्यातील या नरसंहाराने पुन्हा एकदा बिहारमधील ग्रामीण भागात अंधश्रद्धेचं भयाण स्वरूप उघड केलं असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनाकडून कडक कायद्यानं आणि जनजागृती मोहिमांद्वारे काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.