PUNE (फोटो सौजन्य : PINTEREST)
पुण्यात बाणेरमधील एका 23 वर्षीय तरुणाला सायबर चोरट्यांनी तब्बल 42 लाख 95 हजार रुपयांना गंडवले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून या तरुणावर दिल्लीमध्ये 50 खटले दाखल असल्याचा खोटा दावा करत त्याच्याकडून बँक तपशील घेण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या खात्यातील संपूर्ण रक्कम हडप करण्यात आली. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घडल्याची माहिती आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कोर्टाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलवर स्काईप ॲप्लिकेशन वापरतात. या स्काईप ॲपवर त्यांना 2 सप्टेंबर 2024 रोजी एकाने संपर्क करून आपण दिल्ली केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय मधून बोलत असल्याचे सायबर चोरट्यांनी भासवले. या चोरट्यांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावावर दिल्लीत अनेक खटले दाखल असल्याची धमकी दिली. तसेच सीबीआय अधिकारी तुमचा शोध घेत असल्याची सुद्धा बतावणी केली. यावर न थांबता या सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा आधार कार्ड नंबर विचारून त्यांच्या आधार कार्डच्या नावावर 50 खटले असल्याचं सांगितलं. यावर फिर्यादी यांनी माझ्यावर कुठले ही खटले नसल्याचे सांगितल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याची शहानिशा करण्यासाठी फिर्यादी यांना बँक खात्याचे नंबर देण्यास सांगितले.
बँक खात्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना बँकेतील रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्स्फर करण्यासाठी सांगितली. सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे वाटून फिर्यादी यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर 42 लाख 95 हजार 637 रुपये ट्रान्स्फर केले. बँक खात्यातील सर्व रक्कम गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी स्काईप धारकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यांच्याकडून कुठले ही उत्तर आलं नाही. बाणेर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.