नेमकं प्रकरण काय?
जयगड येथील अकबर मोहल्ला परिसरात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक नासिर अब्दुल्ला बावडे यांनी या फसवणुकीबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे ‘सेवानिवृत्त शिक्षकांचे संदखोल केंद्र’ या व्हॉट्सअॅप ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांच्या या ग्रुपवर अज्ञात मोबाईल धारकाने ‘बँक ऑफ इंडिया’ संबंधित माहितीची एक अनोळखी आणि बनावट ‘पीडीएफ’ तसेच एक ‘एपीके’ (APK) फाईल पाठवली. जयगड-संदखोल येथील एका शिक्षकाने व्हॉट्सअॅपवर आलेली बनावट बँक पीडीएफ फाईल मोबाईलमध्ये ‘डाऊनलोड’ करून उघडताच आरोपीने त्यांच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला.
यानंतर आरोपीने बावडे यांच्या ‘बँक ऑफ इंडिया’च्या पगार खाते आणि बचत खात्यामधून त्यांच्या परवानगीशिवाय ६ लाख ८५,५१४ इतकी मोठी रक्कम परस्पर अनोळखी बँक खात्यावर वळती केली. विशेष म्हणजे आरोपीने याच पद्धतीने साक्षीदार शिला शंकर वाघधरे (रा. अंबुवाही) यांच्या ‘बँक ऑफ इंडिया’ खात्यामधून देखील ₹७१,००० रक्कम काढून घेतली. अशाप्रकारे फिर्यादी आणि साक्षीदार दोघांची मिळून एकूण ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची फसवणूक झाली.
गुन्हा दाखल
आपली सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बावडे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेची गांभीर्याने दाखल घेत जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६६ (सी), ६६(डी) प्रमाणे सायबर फसवणूक, ओळख चोरी आणि संगणक स्त्रोत कोडचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयगड पोलीस या अज्ञात सायबर चोरट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी अनोळखी लिंक आणि फाईल्स डाऊनलोड करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
Ans: व्हॉट्सअॅप
Ans: बँक ऑफ इंडिया
Ans: ७ लाख ५६ हजार ५१४






