पोफळी येथील महानिर्मिती कंपनीतील कामगार, कर्मचारी व अभियंते यांनी स्थापन केलेल्या या पतसंस्थेकडे सुमारे 62 सभासदांचे दोन कोटी 25 लाख रुपयांचे ठेव खाते असल्याची माहिती असून, ही रक्कम परत न मिळाल्याने सभासदांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कर्जवसुलीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, सहकारी बँकेने महानिर्मिती विभागाला थेट वसुली करण्याचे पत्र दिले असून, याशिवाय संस्थेविरोधात आणखी दोन गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. दिव्यांग निवृत्त कार्यकारी अभियंता प्रमोद हरिश्चंद्र मोने यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या ३६ लाख रुपयांच्या ठेवीची परतफेड न झाल्याबाबत उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे.
तसेच, आपल्या नावाने बोगस कागदपत्रे तयार करून 6 जून 2022 रोजी पाच लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा आरोप सभासद अमोल जगन्नाथ सपकाळ यांनी केला आहे. हे कर्ज आता सहा लाख रुपयांपर्यंत वाढले असून, आपण कोणत्याही कर्ज प्रकरणास सहमती दिली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संस्थेने जिल्हा बँकेकडून वलीन कॅश क्रेडिटच्या माध्यमातून दोन कोटी 55 लाख रुपये उचलल्यामुळे, भविष्यात ही रक्कम थकित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन्ही तक्रारदारांनी संचालक मंडळाची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणामुळे पोफळी महानिर्मिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सभासदांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक व सभासदांनी सहकार विभागाने तातडीने चौकशी सुरू करावी, अशी मागणी केली आहे.






