कल्याण : आंबिवली रेल्वे स्थानक (Ambiwali Railway Station) परिसरातील काही रिक्षा चालक (Rickshaw Driver) रेल्वे अधिकारी (Railway Officer), पोलीस (Police) यांना जुमानत नसल्याचे समोर आले आहे. थेट आंबिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरुन प्रवासी वाहतूक करीत असून यामुळे प्रवासी हैराण आहेत. प्लॅटफॉर्मवरुन रिक्षा घेऊन जाऊ नको, अशा सूचना देऊनही अनेक रिक्षा चालक ऐकत नाहीत. याबाबतचा आंबिवली रेल्वे स्थानकातील एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.
आंबिवली स्थानकातील व्हिडीओमध्ये एक प्रवासी सदर रिक्षाचालकाला रिक्षा प्लॅटफॉर्मवरुन घेऊन जाऊ नये, म्हणून विरोध करीत आहे. मात्र, त्याला न जुमानता प्लॅटफॉर्मवरुन रिक्षा घेऊन जात असल्याचे दिसत आहे. रिक्षा चालकाच्या या उद्दामगिरीबद्दल प्रवासी आश्चर्य व्यक्त करीत आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आंबिवली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रकरण तपासून प्लॅटफॉर्मवरुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांचा शोध सुरू केला.