सौरव गांगुलीकडून इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल चिंता(फोटो-सोशल मीडिया)
Sourav Ganguly concerned about Imran Khan’s health : पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती सध्या चांगली नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक वृत्तसमोर येत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत क्रीडा क्षेत्रातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह १४ माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांनी पाकिस्तान सरकारकडे इम्रान खान यांच्या चांगल्या उपचारांसाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर आता भारताचा माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली देखील यावर भाष्य केले आहे. भारताच्या या दादाने म्हटले आहे की, त्यांना योग्य वैद्यकीय सेवा आणि आदर मिळाला पाहिजे.
माध्यमांशी बोलताना गांगुली म्हणाला की, “मला आशा आहे की त्यांची प्रकृती सुधारेल आणि त्यांना योग्य उपचार देखील मिळतील. त्यांनी प्रथम पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून जागतिक स्तरावर पाकिस्तानला ओळख मिळवून दिली आहे. म्हणूनच, मला वाटते की त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे.”
सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यासह १४ माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांकडून इम्रान खानसाठी चांगले उपचार आणि मानवी उपचारांसाठी पाकिस्तान सरकारकडे आवाहन करण्यात आले होते. एका पानाच्या संयुक्त निवेदनात या माजी कर्णधारांनी १९९२ च्या विश्वचषक विजेत्या कर्णधारासाठी वैद्यकीय, कायदेशीर आणि मानवतावादी संरक्षणाची मागणी केली आहे. वृत्तांनुसार, इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहेत आणि अलीकडेच त्यांच्या आरोग्याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्यामध्ये त्यांची दृष्टी बिघडल्याच्या बातम्यांचा देखील समावेश आहे.
त्यांच्या निवेदनात, माजी कर्णधारांनी लिहिले आहे की, इम्रान खान यांना “पात्र तज्ञांकडून तात्काळ, पुरेशी आणि सतत वैद्यकीय सेवा” प्रदान करण्यात आली पाहिजे. शिवाय, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, कुटुंबासोबत नियमित भेटींसह, अटकेच्या मानवी आणि आदरयुक्त परिस्थिती सुनिश्चित करायला पाहिजे. त्यांच्या आरोग्याबद्दलच्या अलीकडील अहवालांमुळे, विशेषतः त्यांच्या अटकेदरम्यान त्यांच्या दृष्टीमध्ये गंभीर बिघाड झाल्याने त्यांना खोल चिंता निर्माण झाली आहे.
१४ माजी कर्णधारांनी लिहिले, “क्रिकेटपटू म्हणून, आम्हाला निष्पक्ष खेळ, आदर आणि प्रतिष्ठेची मूल्ये समजतात. इम्रान खानच्या दर्जाच्या व्यक्तीचा आदर कारायला पाहिजे. त्यांनी १९९२ च्या क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, जो कौशल्य, नेतृत्व आणि खिलाडूवृत्तीचे प्रतीक आहे.”
इम्रान खान यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी पाकिस्तान सरकारला पत्र लिहिणाऱ्या माजी कर्णधारांमध्ये ग्रेग चॅपेल, मायकेल आथर्टन, अॅलन बॉर्डर, मायकेल ब्रेअरली, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, डेव्हिड गॉवर, किम ह्यूजेस, नासेर हुसेन, क्लाइव्ह लॉयड, स्टीव्ह वॉ आणि जॉन राईट यांचा समावेश आहे.






