अहिल्यानगरमध्ये कायदे सुव्यवस्था धाब्यावर;केडगाव हत्याकांडातील आरोपी संदीप कोतकरांची गावात दहशत
अहिल्यानगर/ गिरीश रासकर : न्यायालयात हजर राहण्यासाठी आलेले माजी महापौर संदीप कोतकर यांची त्यांच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली तसेच ही मिरवणूक ज्या शिवसैनिकांचे खून झाले त्या शिवसैनिकांच्या घरासमोरून घेण्यात आली. दिवंगत शिवसैनिकांच्या घरासमोर फटाके फोडले. तसंत दंड थोपवून पुन्हा एकदा पिडित कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप भानुदास कोतकर, सचिन भानुदास कोतकर, विनोद लगड, निलेश (बाप्पु) सातपुते, भुषण अशोक गुंड, रमेश तात्याभाऊ कोतकर, विजय कोतकर, अशोक रावसाहेब कोतकर यांच्यासह जवळपास 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामधील आरोपींनी पुन्हा एकदा खून झालेल्या शिवसैनिकांच्या घरापुढे जाऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा लागलेली आणि सध्या जामीन घेऊन जेल बाहेर असलेले तसेच केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात आरोपी असलेल्या माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांच्या समर्थकांनी हा प्रकार केला आहे.
माजी महापौर संदीप कोतकर यांच्यावर अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यानंतर त्यास जिल्हा बंदीची अट करण्यात आली आहे. निवडणुकीचे कारण सांगून ही जिल्हा बंदी उठवण्यासाठी नगर न्यायालयात माजी महापौर संदीप कोतकर उपस्थित होते. मात्र कोर्टात हजर राहण्यासाठी आलेल्या माजी महापौर संदीप कोतकर यांची त्यांच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली.
हेही वाचा:ऐन निवडणुकीत सापडलं कोट्यवधींचं घबाड; तब्बल 52 कोटींचा मुद्देमाल जप्त
घटनेची हकीगत अशी की 2018 साली प्रभाग क्रमांक 16 मध्ये महानगरपालिकेची पोट निवडणूक झाली होती या पोटनिवडणूक नंतर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते आणि याच दरम्यान संजय केशव कोतकर आणि वसंत आंनदा ठुबे या दोन शिवसैनिकांची राजकीय वैमान्यातून अत्यंत निर्घृणपणे गळा चीरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संदीप कोतकर हा मुख्य आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या जिल्हा न्यायालयात सुरु असून त्यापूर्वी अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह त्याचे बंधू सचिन कोतकर भानुदास कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. या शिक्षेला स्थगिती घेऊन सध्या सर्वजण जमिनीवर बाहेर आहेत मात्र न्यायालयाने त्यांना जिल्हा बंदीचे आदेश दिले होते.
विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आणि कुटुंबातील एक सदस्य विधानसभेला उभारणार असल्याचे कारण देत संदीप कोतकर यांनी आपल्यावर लागू असलेली जिल्हा बंदी उठवावी या यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर काल सुनावणी होती, मात्र जिल्हा बंदी उठवण्याआधीच संदीप कोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी संदीप कोतकर यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र हे स्वागत करत असताना संदीप कोतकर आणि त्यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा ज्या शिवसैनिकांचा खून केला होता त्यांच्या घरासमोर जाऊन फटाक्यांची आतिषबाजी करत दंड थोपटून पुन्हा एकदा त्या शिवसैनिकांच्या कुटुंबांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणामुळे कै.संजय कोतकर यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनिता कोतकर ह्या चांगल्याच भयभीत झाल्या आणि त्यांनी मुलगा संग्राम कोतकर यास फोन करून घटनेची हकीगत सांगितली. त्यानंतर संग्राम कोतकर यांनी तातडीने घरी धाव घेतली. त्यावेळी संदीप कोतकर यांच्यासह त्याच्याबरोबर असलेले कार्यकर्ते तिथून निघून गेले होते मात्र त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून ठेवल्यामुळे संपूर्ण घटना समोर आली. ज्या शिवसैनिकांचा खून केला त्याच शिवसैनिकांच्या घरासमोर जाऊन आनंद उत्सव साजरा करून पुन्हा एकदा गुंडागिरी कशी असते हे दाखवून देण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आल्याचा आरोप संग्राम कोतकर यांनी केला आहे. याबाबत संग्राम कोतकर यांनी तातडीने अहमदनगर मधील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.