अक्षय शिंदेचा एन्काऊंटर कसा झाला? काय घडलं नेमकं ठाणे पोलिसांचा यथोचित खुलासा (फोटो सौजन्य-X)
महाराष्ट्रातील बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. 23 वर्षीय अक्षयवर शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली. यानंतर त्याने गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि अक्षय ठार झाला. वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता विविध आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं? याबद्दलचा खुलासा केला.
अक्षय शिंदे एन्कांऊटरप्रकरणी ठाणे पोलिसांनी मंगळवारी (24 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाणे पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेश साळवी यांनी सोमवारी घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. बदलापूरचे पोलीस अक्षय शिंदेला कायदेशीर पद्धतीने घेऊन जात असताना, अक्षयने पोलिसांची पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्याच्याकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला आहे. या संदर्भात मुंब्रा पोलीस स्थानकात 307 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 132/109/131 अन्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.