सौजन्य - नवराष्ट्र टीम
तासगाव : तासगाव तालुक्यातील वायफळे येथील रोहित संजय फाळके याच्या खून प्रकरणी मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला जेरबंद करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथे ही कारवाई केली. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात या पथकाला यश आले आहे.
वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद होत आहेत. गेल्या काही वर्षात हा वाद विकोपाला गेला होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी विशाल फाळके हा आपल्या साथीदारांसह वायफळे येथील बसस्थानक चौकात आला. त्या ठिकाणी त्याने रोहित फाळके व त्याच्या मामांची मुले आदित्य साठे व आशिष साठे (रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर तलवार व कोयत्याने हल्ला चढवला. रोहित हा घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र आदित्य व आशिष यांच्यावर वर्मी घाव बसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते.
याचवेळी त्या ठिकाणी बसलेल्या सिकंदर अस्लम शिकलगार (रा. वायफळे) याच्यावर या टोळक्याने हल्ला केला. तेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, रोहित हा आपल्या घराकडे पळून गेला. विशाल फाळके व त्याच्या टोळीने त्याचा पाठलाग केला. घराजवळ त्याला कोयता व तलवारीने मारहाण केली. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील संजय, आई जयश्री हे धावून आले. मात्र त्यांच्यावरही विशालसह त्याच्या टोळीने हल्ला केला. जखमी अवस्थेत सर्वांना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रोहित फाळके याचा मृत्यू झाला. तर जयश्री फाळके यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. इतर तिघांवर भिवघाट येथील रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी विशाल फाळके याच्यासह त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, तासगावचे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली. ठिकठिकाणी विशाल फाळके व त्याच्या टोळीचा शोध सुरू झाला. अखेर अवघ्या २४ तासाच्या आत पुणे येथील भारती विद्यापीठ परिसरात विशाल फाळकेच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
हे सुद्धा वाचा : Pune Crime : पुण्यात चाललंय काय! सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवला अन्…
गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तासगाव पोलीस ठाणे, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे (पुणे शहर), वारजे-माळवाडी पोलीस ठाणे (पुणे शहर), बिबवेवाडी पोलीस ठाणे (पुणे शहर), शिवाजीनगर पोलीस ठाणे या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो मोक्कामधील आरोपी आहे. त्यामुळे त्याच्यासह टोळीला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी ‘फिल्डिंग’ लावली होती. अखेर त्याला ताब्यात घेण्यात ‘एलसीबी’च्या पथकाला यश आले.