संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरात सोन साखळी चोरट्यांसोबतच गर्दीतून चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांनी देखील उच्छाद घातला असून, दररोज राज्यासह देशभरातील वेवेगळ्या भागातून चोरटे लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून चोरीची घटना समोर आली आहे. पुण्यातील दोन वेगवेगळ्या भागात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम चोरल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन्ही प्रकरणांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना १२ ऑगस्टला दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान कात्रज चौक ते वारजे-माळवाडी या प्रवासादरम्यान घडली आहे. एक ५८ वर्षीय महिला रिक्षाने प्रवास करत असताना, अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतील पाकिटातून एक लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
दुसरी घटना १३ ऑगस्टला सकाळी साडेनऊच्या सुमारास हडपसर येथे रवीदर्शन बस थांब्यावर घडली आहे. याबाबत एका ५४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार या एसटी बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. अधिक तपास पोलिस करत आहेत.
उघड्या दरवाजांमधूनही चोऱ्या
पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असतानाच चोरटे आता उघड्या दरावाजातून आत शिरत घरातून किंमती ऐवज चोरू लागले आहेत. चतु:शृंगी, वाघोली आणि कोंढव्यात प्रत्येकी एका ठिकाणी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप व मोबाइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील नागरिक झोपेत असताना, तसेच घरातील वृद्ध महिला एकटी असताना चोरट्यांनी ही कृत्ये केली आहेत.
साडेतीन वर्षात तब्बल 73 कोटींचा ऐवज लंपास
सुरक्षित म्हणवणाऱ्या पुण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, पुणेकरांच्या घरांवर चोरटे डल्ला मारत ‘करोडपती’ होत आहेत. पुणे पोलिस मात्र, या चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षातील केवळ घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पाहिल्यानंतर हे वास्तव दिसत आहे. साडे तीन वर्षात पुण्यासारख्या शांत व सुरक्षित शहरातील २ हजार बंद घरे फोडत तब्बल ७३ कोटींचा ऐवजावर डल्ला मारला आहे. त्यातील केवळ १३ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज परत मिळविण्यात यश आलेले आहे. त्यातून घरफोड्यांमागील भयावह वास्तव दिसत आहे.