अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी भर दिवसा घरफोडी झाली होती या चोरीत तब्बल १० लाखांचे सोने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आ ला होता.दरम्यान गुन्ह्याची गांभीर्यता ओळखून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. यात २ पथके तयार करून गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला. अवघ्या ४८ तासाच्या आतच संबंधित चोरी करणारे आरोपींचा शोध घेऊन तब्बल ११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे .
घटनेची अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील फिर्यादी सोमनाथ शिवाजी भडांगे हे दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास कार्यक्रमानिमीत्त बाहेरगावी गेले होते. हाच डाव साधून अज्ञात चोरट्याने फिर्यादींच्या राहत्या घराचे कुलूप तोडले. घरातील ९,९२,२८०/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला. घरफोडीच्या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ५५३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षकांकडून २ विशेष पथके नियुक्त –
यावेळी घटनेची माहिती घेऊन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हा उघडकीस आणणेकरीता २ विशेष पथके तयार करण्यात आले.
त्यानुसार दिनांक १४ ऑगस्ट रोजी प्राप्त माहितीनुसार आरोपींचा शोध घेत असतांना टोण्या काळे हा त्याचे राहत्या घरी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आरोपीचे घरी जावुन त्याचा शोध घेत टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे (वय २० वर्षे, रा. लखमापुरी, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर) याला ओळख पटवून ताब्यात घेतले.
या आरोपींना संगमनेर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. ५५३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.
ताब्यातील आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत –
दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत तपासात असं लक्षात आलं की, आरोपीने दागिने त्याच्या राहत्या घराजवळ पुरुन ठेवल्याचे सांगितले. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने आरोपीकडुन ११,७९,१४०/- रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.
ताब्यातील आरोपींवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल –
आरोपी टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे याच्यासह साथीदारांवर यापुर्वी अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, बीड जिल्ह्यामध्ये खुन, जबरी चोरी, घरफोडीचे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असून काही गुन्ह्यात फरार देखील आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर, ज्योती शिंदे यांचा समावेश करण्यात आलेला आहे.