संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज राज्यासह देशभरातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता गुन्हेगारांना पिस्तूलांचे व्यसन जडावे असाच काहीसा प्रकार पुण्यात पाहिला मिळत असून, खून, वाहन तोडफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांतून जामिनावर बाहेर आल्यानंतर लागलीच काही जणांनी पिस्तूलांचा साठा बाळगल्याचा प्रकार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी छापेमारी करून चौघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखा यूनिट सहाच्या पथकाने वाघोलीतील भावडी रोडवरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली आहे.
सूरज उर्फ नन्या संतोष मोरे (१९, रा. वाघोली), ओमकार अरुण नादवडेकर (१९, रा. वाघोली), जगदीश उर्फ जॅक्स शंकर दोडमनी (२४), स्वयंम उर्फ आण्णा विजय सुर्वे (१९, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहीद पठाण, अंमलदार गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नेहा तापकीर, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांच्यासह पथकाने केली आहे. चौघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
गुन्हे शाखा यूनिट सहाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. त्यादरम्यान तेव्हा मोरे व नादवडेकर यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार त्यांना वाघोली भागातून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तूल आढळून आले. त्यांच्या चौकशीत सुर्वे, दोडमनी यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार त्या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले. आरोपींकडून एकूण चार पिस्तूल आणि पाच जिंवत काडतूसे असा सुमारे १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी सुरज याच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. तर ओमकारवर लोणीकंद पोलिसांत एक गुन्हा नोंद आहे. तसेच जगदीश याच्यावर लष्कर व येरवडा पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, कटकारस्थान आणि अन्य गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.