संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. बाजीराव रोड परिसरात व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडील १ लाख ३० हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे.
पुणे शहरात सातत्याने एकट्या नागरिकांना धमकावून लुटले जात असताना पोलिसांना या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ६० वर्षीय व्यावसायिकाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचे सदाशिव पेठेतील कुमठेकर रस्ता भागात इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. एक ग्रॅम सोन्याचे दागिन्यांची विक्री केली जाते. दिवाळीमुळे गुरुवारी रात्री उशीरापर्यंत दुकान सुरू होते. व्यावसायिक शुक्रवार पेठेत राहायला आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करुन व्यावासायिक दुचाकीवरुन घरी निघाले होते. व्यवसायातून जमा झालेली एक लाख ३० हजारांची रोकड त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. बाजीराव रस्त्यावरील टेलीफोन भवनजवळील गल्लीतून ते रात्री घरी निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. व्यावसायिकाला धक्काबुक्की केली. व्यावसायिकाने घाबरून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख ३० हजारांची रोकड चोरट्यांना दिली. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती घाबरलेल्या व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बाजीराव रस्ता, सुभाषनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.
कालची लूटमारीची घटना
पुणे शहरात लुटमारीच्या घटना घडत असून, मार्केडयार्ड परिसरात एका दुचाकीस्वार व्यापाऱ्याला धमकावून त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटल्याची घटना बिबवेवाडी-गंगाधाम रस्त्यावर घडली होती. त्यातील आरोपी देखील पसार आहेत. त्यांचाही पोलिसांना थांगतप्ता लागलेला नाही. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आणखी एक घटना घडली असून, ऐन सनासुदीच्या काळात लुटमारीच्या घडत असल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.