चावी तयार करणाराच निघाला चोर (Photo : Key Maker (iStock )
अमरावती : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न यासह चोरी, दरोड्याची प्रकरणेही समोर येत आहेत. त्यात आता अमरावतीत दारोदारी फिरून कुलूपाच्या चावी तयार करण्याचा बहाणा करत घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला राजापेठ पोलिसांनी बुलडाण्यातून शनिवारी (दि. 8) अटक केली.
तेजपालसिंग निहालसिंह भाटिया (वय 35, रा. सुरत, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रवीनगरात केलेल्या घरफोडीची कबुली दिली. आरोपी मूळचा गुजरात राज्यातील असून, तो विविध शहरात फिरून चावी विकण्याचा बहाणा करून नागरिकांच्या घराची रेकी करीत होता. 29 डिसेंबर 2024 रोजी रविनगरातील रहिवासी खेडकर यांच्या घरात अज्ञात चोराने चोरी करून मोबाईल, चांदीचे दागिने व दहा हजाराची रोख लंपास केली होती.
दरम्यान, त्यांच्या घरासमोरील दुसरे घरसुद्धा फोडण्यात आले होते. या घटनेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा तपास राजापेठ पोलिस करत होते. पोलिसांनी तपास करून आरोपी निष्पन्न केला. त्यानंतर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, राजापेठचे पोलिस निरीक्षक पुनिट कुलट यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख पोलिस हवालदार मनीष करपे, पंकज खटे, सागर बजगवरे, रवी लिखितकर यांच्या पथकाने बुलढाणा जाऊन आरोपी तेजपालसिंगला मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला 8 मार्च रोजी अमरावतीत आणले गेले. त्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
नागपुरातून चोरल्या दोन दुचाकी
आरोपी तेजपालसिंग हा सुरतवरून निघाल्यानंतर नागपूर, अकोला, रामटेक अशा आदी शहरात फिरून चावी बनविण्याचा बहाणा करत फिरत होता. तो दारोदारी फिरून नागरिकांच्या घराच्या कुलूपाच्या चाव्या बनवून देत होता. अशातच तो रेकी करून बंद घरांना लक्ष्य करायचा. त्यानंतर तो मध्य प्रदेशातील एका नातेवाईकाच्या घरी जाऊन राहत होता आणि तेथे चोरीचा मुद्देमाल विकत होता. ही बाब पोलिस चौकशीत पुढे आली आहे. तो अमरावती येण्यापूर्वी रामटेक व नागपुरात होता. त्याने नागपुरात दोन दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली आहे.