पुण्यात सराफी पेढीत चोरट्यांचा डल्ला (फोटो- istockphoto)
पुणे : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरलेल्या चोरट्यांनी पावणेचार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. याबाबत सराफी पेढीच्या मालकांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांची सराफी पेढी वडगाव शेरी भागात आहे. आठवड्यापूर्वी चोरटे खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत शिरले. दागिने खरेदीचा बहाणा चोरट्यांनी केला. पेढीतील कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतविले. पेढीतील कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पावणेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिन्यांची मोजदाद करत असताना चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सराफ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे तपास करत आहेत.
पुण्यात चोरट्यांनी फोडली ५ दुकाने
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरात गुन्हेगरीचे प्रमाण वाढले आहे. कोयता गॅंग, हीट अँड रन, महिलांवरील अत्याचारांचे प्रकार, अपघाताची सत्र सुरूच आहेत. तर पुण्यात सायबर क्राईमच्या घटना देखील वाढलेल्या दिसत आहेत. चोरीच्या घटना अशा सर्वच प्रकारचे गुन्हे वाढताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुणे पोलीस कसोशीने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान आता पुण्यातील वर्दळीचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या फर्ग्युसन रस्त्यावर एका रात्रीत पाच दुकाने फोडल्याची घटना घडली आहे.
सध्या दिवाळीमुळे पुणे शहरात गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत , प्रमुख मार्गांवर वर्दळ वाढली आहे. मात्र याचाच फायदा घेत चोरट्यांनी फर्ग्युसन रस्त्यावर दुकाने फोडली आहेत. चोरट्यांनी पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील दुकाने फोडली आहेत. एका रात्रीत एकूण ५ दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, चोरट्यांनी लाखोंचा माल लुटला आहे. जवळपास १.२५ लाख रुपये लुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डेक्कन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अट्टल चोरट्यांनी दुकाने फोडली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यात दोन गटांत हाणामारी
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता आळंदी रस्त्यावर असलेल्या कळस गावात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारीत चौघे जखमी झाले असून, याप्रकरणी परस्परविराेधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल भीष्मा चव्हाण (वय २४, रा. कळस ) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चव्हाणच्या तक्रारीनुसार रोहित लोखंडे (रा. दिघी), गगन लाड (रा. टिंगरेनगर) आणि स्वप्नील महाजन (रा. कळस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.