गॅस सिलिंडरच्या वाहनाने रुग्णालय उडवण्याची धमकी (फोटो सौजन्य - iStock)
नागपूर : धंतोलीतील एका खाजगी रुग्णालयाला गॅस सिलिंडरच्या वाहनाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या धमकीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोट्यवधींच्या भूखंड व्यवहारातून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकाराची धंतोली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, गुन्हाही दाखल केला आहे.
याबाबतची फिर्यादी डॉ. महेश चंदुलाल फुलवानी (वय 55, रा. श्रीकृष्ण हॉस्पिटल, धंतोली) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. नीरज राधेश्याम गांधी (रा. विजयानंद सोसायटी) असे आरोपीचे नाव आहे. फुलवानी यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी नवीन रुग्णालय सुरू करण्यासाठी सोमलवाडा येथे 13.50 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी करण्याचा करार केला होता. करारावेळी त्यांनी 5.50 कोटी रुपये आगाऊ दिले, तर उर्वरित रक्कम वर्षभरात देण्याचे ठरले. मात्र, या भूखंडावर दुसऱ्याच कंपनीने दावा दाखल केल्याने प्रकरण न्यायालयात गेले आणि उर्वरित रक्कम थांबविण्यात आली.
दरम्यान, नोव्हेंबर 2017 मध्ये आरोपी नीरज गांधी याने रुग्णालयात येऊन डॉ. फुलवानी यांची भेट घेतली व संबंधित भूखंड आधीच विकला गेल्याचा दावा केला. डॉ. फुलवानी यांनी त्याला कांचनगंगा रियलटर्सच्या संचालकांकडे चौकशी करण्यास सांगितले. मात्र, गांधी याने जागेचा ताबा सोडण्यासाठी डॉ. फुलवानी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी हा प्रकार कांचनगंगा रियलटर्स प्रा. लि. च्या संचालकांना सांगितला.
तेव्हा संचालकांनी त्याच्याशी कुठलाही सौदा झाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. फुलवानी यांनी गांधीला प्रतिसाद दिला नाही. यामुळे चिडलेल्या गांधीने रक्कम न दिल्यास गॅस सिलिंडरच्या वाहनाने रुग्णालय उडवण्याची धमकी दिली. मात्र डॉ. फुलवानी यांनी त्याच्या धमकीला न घाबरता त्यांनी याप्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली आहे.
पोलिसांचा तपास सुरु
याप्रकरणाची तक्रार येताच धंतोली पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.