(फोटो- istockphoto)
पुणे: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पुणे पोलिसांनी लावलेल्या कडेकोट बंदोबस्त भेदून गणेश विसर्जन मिरवणूकीत चोरट्यांनी तब्बल ३०० मोबाईलवर डल्ला मारला. ३० तास चाललेल्या मिरवणुकीत हे मोबाईल चोरीला गेले आहेत. याप्रकरणी फरासखाना, विश्रामबाग, खडक, समर्थ पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यात विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ९१ मोबाईल चोरीला गेले आहेत. दरम्यान फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश व नाशिक येथील मोबाईल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून २ लाख ७९ हजाराचे २१ मोबाईल जप्त केले आहेत.
गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, कुवळेकर रस्ता आणि टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. ती विसर्जन मिरवणूक दुसऱ्या दिवशी ३ वाजता संपली. दरम्यान दरवर्षीप्रमाणे चोऱ्या टाळण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली होती. तर इतर बंदोबस्त देखील कडेकोट ठेवण्यात आला होता. तरीही मोबाईल चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. त्यांनी मुख्य मिरवणुकीतील गर्दी लक्षात घेत तिकडे आपला मोर्चा वळवला. तसेच अलका चौकातील गर्दीतही हात सफाई केली. एकट्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात विसर्जनाच्या दिवशी ९१ मोबाईल चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर उत्सवाच्या दहा दिवसांत २५ मोबाईल चोरीला गेल्याची नोंद आहे. मोबाईल आणि सोन साखळी चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची पथके होती. तसेच पोलीस वारंवार ध्वनिक्षेपकावरुन मोबाईल चोरांपासून सावध रहाण्याचा उदघोष करत होते. मात्र प्रचंड गर्दीचा फायदा चोरट्यांनी चांगलाच उठवल्याचे दिसते.
फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश तसेच नाशिक जिल्यातील टोळीतील फैजल अजीज खान(२२,रा.नाशिक) आणि कालु राजु पारखी( रा.मध्यप्रदेश) या दोघांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, नितीन जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. त्यांच्याकडून २ लाख ७९ हजाराचे २१ मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
तब्बल ३० तास चालली गणपती विसर्जन मिरवणूक
अनंत चतुर्दशी दिवशी सुरू झालेली पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक अखेर संपली आहे. पुण्यातील गणती विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा गणपती अखेर अल्का चौकातून मार्गस्थ झाला. पुण्यातील शेवटचा गणपती मंडळ विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. काल सकाळी सुरू झालेली गणपती विसर्जन मिरवणूक अखेर आज संपली आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक ही तब्बल ३० तासांपेक्षा जास्त काळ चालली आहे. १८५ पेक्षा जास्त गणेश मंडळे अल्का चौकातून मार्गस्थ झाली.
सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर पाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा अशा ५ मानाच्या गणपतीचे विसर्जन संध्याकाळच्या सुमारास पार पडले. त्यानंतर पुणेकरांचे आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विसर्जन करण्यात आले.