माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल (फोटो- सोशल मीडिया)
माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आरोप
नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा
पुणे: निवडणूक आचारसंहिता लागू असताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वाहनांवर राजकीय चिन्हे, स्पीकर तसेच नेत्यांचे फोटो लावून प्रचार केल्याप्रकरणी पर्वती परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी गदादे पाटील (रा. पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नेत्याचे नाव आहे.
निवडणूक आयोगाच्या निरीक्षणाअंतर्गत ललिता सुदाम तमनर (वय ४३, रा. धानोरी) यांनी याबाबत फिर्याद दिली. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पर्वती पायथा रोडवरील कॅनॉल पुलाजवळ, गदादे पाटील यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, टेम्पो आणि दोन रिक्षांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह, स्पीकर तसेच उमेदवार व अन्य राजकीय नेत्यांचे फोटो लावून प्रचार करण्यात येत होता. मात्र, यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम २२३ तसेच लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत कलम १२७ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, निवडणूक काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
Ladki Bahin Yojana: दोन महिन्यांचा हप्ता अद्याप बाकी अन् त्यातच 47 हजार…; सरकार अॅक्शन मोडमध्ये
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या होत्या. जागावाटपावरून दोन्ही राष्ट्रवादीत मोठे मतभेदही झाले होते. पण अखेर पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत एकमत झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात आज दुपारी दोन्ही राष्ट्रवादीकडून पुण्यात पत्रकार परिषद होऊ शकते. या पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच पुणे महानगरपालिकेत अजित पवार गट 125 तर शरद पवार गट 40 जागांवर लढेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळातून समोर आली आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीचा निर्णय झाल्यानंतर झालेल्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ आणि तुतारी एकत्र लढणार आहेत. कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, असी कार्यकर्ते आणि नागरिकाची इच्छा होती. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर आणि व्यवहारिका निर्णय घेण्याची गरज असता. त्यामुळे आम्ही राज्याच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.






