File Photo : Crime
झरी जामणी : तालुक्यातील अडेगाव येथे जागेच्या वादावरून दोन कुटुंबात मारहाण झाली. या मारहाणीत लोखंडी सळई व फावड्याचा वापर करण्यात आला. याप्रकरणी मुकुटबन पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे.
हेदेखील वाचा : Pune Crime News: वाहने चोरी करणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक; चोरट्याकडून 2 रिक्षा आणि एक…
रामदास नथ्थू पाचभाई (वय 72, रा. अडेगाव, ता. झरी), शेजारी सुधाकर पुंडलीक पेटकर (वय 50) हे त्यांच्या कुटुंबीयांसह राहतात. पाचभाई यांना त्यांच्या घराच्या भिंतीची छपाई करायची होती. सोमवारी (दि.1) सकाळी पाचभाई यांनी पेटकर यांना त्यांच्या घरावरील टीन त्यांच्या हद्दीत सरकवण्यास सांगितले. यावेळी दोघांत वाद झाला. सुधाकर यांचा मुलगा गणेश पेटकर (30) याने फावड्याने रामदास यांच्यावर वार केला. यात रामदास यांच्या बोटाला दुखापत झाली. तर सुधाकर याने हातातील सळईने रामदास यांच्या डोक्यावर वार केला. यात रामदास यांच्या कानाच्या मागच्या बाजूस दुखापत झाली. याच वेळी रामदास पाचभाई यांचा मुलगा तुळशीराम पाचभाई (45) हा मध्यस्थी करण्यास आला. तेव्हा त्यांनी तुळशीराम यांना देखील सळाखीने मारहाण केली.
सुधाकर याचे जावई रमेश धुर्वे (वय 40) याने दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, गावातील लोक जमा झाले व त्यांनी भांडण सोडविले. तर दुसऱ्या तक्रारीत, रामदास यांनी सुधाकर यांना छपाईसाठी टीन सरकवण्यास सांगितले. मात्र, छपाईच्या बाजूने तुमची जागा नसल्याने तुम्हाला या बाजूने छपाई करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, रामदास व त्याचा मुलगा तुळशीराम यांनी बळजबरीने सुधाकर यांच्या घराचे टीन व फाटे सरकवण्यास सुरुवात केली.
यावेळी रामदास पाचभाई यांनी शिवीगाळ करत त्यांच्या हातातील लोखंडी सळाख सुधाकर यांच्या डोक्यावर मारली. मारहाणीत सुधाकर यांचे डोके फुटले. तर तुळशीराम पाचभाई याने हातातील फावड्याने सुधाकर यांचा मुलगा गणेश याच्या डोक्यावर प्रहार केला. या मारहाणीत त्याचे देखील डोके फुटले. यावेळी रामदास यांनी पुन्हा छपाईसाठी वाद घालाल, तर जीवे मारणार अशी धमकी दिली, असे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही कुटुंबाने मुकुटबन पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या. त्यावरून पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : Crime News: पुनर्विवाहाची इच्छा असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला चोरट्यांनी हेरले; हनीट्रॅपमध्ये अडकवले अन्…