वाहने चोरणाऱ्याला अटक (फोटो- istockphoto)
पुणे: शहर परिसरात वाहन चोरी करणाऱ्या एका चोरट्याला समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या २ रिक्षा आणि एक दुचाकी जप्त करून तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकिस आणले आहेत. आनंद उर्फ अक्षय प्रल्हाद साळुंखे ( वय २३ वर्षे, रा. मानकाई नगर, आव्हाळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर फडतरे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
शहरात वाहन चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. दरवर्षी वाहन चोरीचा आकडा वाढत आहे. मात्र, पोलीस या घटनांना रोखण्यात अपयशी होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यापार्श्वभूमीवर समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपीच्या मागावर होते. तांत्रिक तपासावरुन पोलिसांच्या पथकाने आरोपी साळुंखेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २ रिक्षा, १ दुचाकी जप्त करून समर्थ, हडपसर आणि चतुशृंगी पोलीस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पुनर्विवाहाची इच्छा असलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला हनीट्रॅपमध्ये अडकवले
पुनर्विवाह करण्यासाठी इच्छूक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून पोलीसांची भिती दाखवून चोरट्यांनी ७२ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६० वर्षीय नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मनीषा शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार ज्येष्ठ नागरिक असून, ते कर्वेनगर भागात राहायला आहेत. त्यांचा घटस्फोट झालेला आहे. ते पुनर्विवाह करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी एका साईटवर विवाह नोंदणी केली होती. चोरट्यांनी त्यांना एक फॉर्म पाठविला. फॉर्ममध्ये त्यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले. नंतर मनीषा शर्मा असे नाव सांगणार्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यातून व्हिडीओ कॉल रेकॉर्डींग केले. व्हिडीओ रेकॉर्डींगच्या माध्यमातून शर्माने सोशल मिडीयात ते रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, तातडीने पैसे भरण्यास सांगत त्यांना हनीट्रॅपमध्ये घेरले.
पुण्यात प्रसिद्ध बिल्डराविरोधात फसवणुकीची तक्रार
महिन्याला दीड टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक अमित लुंकड यांच्यासह इतरांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत ही तक्रार दिली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अमित कांतीला लुंकड, अमोल कांतीलाल लुंकड आणि पुष्पा कांतीलाल लुंकड यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहे. याबाबत प्रविणचंद जैन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली आहे.
हेही वाचा: पुण्यात प्रसिद्ध बिल्डराविरोधात फसवणुकीची तक्रार; नेमकं प्रकरण काय?
लुंकड रियालटी नावाची लुंकड कुटुंबाची कंपनी आहे. सध्या ही कंपनी स्कायवन कार्पोरेट नावाने ओळखली जाते. जैन यांच्या तक्रारीनुसार, २००९ मध्ये जैन कुटुंबिय दिल्ली येथून पुण्यात वास्तव्यास आले. व्यावसायीक कारणानिमीत्ताने त्यांची ओळख अमित लुंकड यांचे वडील कांतीलाल लुंकड यांच्यासोबत झाली. कालांतराने त्यांच्यातील व्यावसायिक संबंध दृढ होत गेले. यावेळी लुंकड यांनी त्यांना लुंकड रियालिटीत गुंतवणुक करण्याचे आमिष दाखविले. अमित आणि अमोल लुंकड यांनी गुंतवणुक केल्यास प्रतिमहिना दीड टक्के परतावा देऊ असे त्यांना सांगितले. त्यानुसार २०१४-१५ दरम्यान जैन आणि त्यांच्या कुटुंबाने तब्बल ६ कोटी ६१ लाख रूपये गुंतवणुक केले.