नायलॉन मांजामुळे लहान मुलगी जखमी (फोटो- सोशल मिडिया)
पुणे:मकरसंक्रातीच्या दिवशीच नायलॉन मांजामुळे तिघे जखमी झाल्याची घटना शहरात घडली असून, यात दोन ज्येष्ठ नागरिकांसह १२ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. छत्रपत्री शिवाजी पुलावर दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. देवराम दत्तात्रय कामठे (वय ६७, सध्या रा. शिवाजीनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. दुचाकीने कामठे मंगळवारी (१४ जानेवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर गावठाणातून शनिवारवाड्याकडे जात होते.
त्यावेळी अचानक मांजा समोर आला. कामठे यांनी प्रसंगावधान राखून मांजा हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मांजाचा फास अंगठ्याला बसला. फास घट्ट बसल्याने त्यांना दुखापत झाली. कामठे यांच्यावर प्रथमोपचार करुन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मांजामुळे आणखी दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये ज्येष्ठासह बारा वर्षीय मुलीचा समावेश आहेत. बबन दिवटे (वय ७०), वंदन देठे (वय १२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मांजामुळे दिवटे यांच्या पायाला जखम झाली. वंदनच्या जिभेला गंभीर दुखआपत झाली. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विक्रेत्यांची माहिती कळवा
संक्रातीच्या दिवशी पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले. नायलॉन मांजावर न्यायालयाने बंदी घातली आहे. तो वापरण्यास व विक्री करण्यास मनाई असताना न्यायालयाचा आदेश धुडकावून छुप्या पद्धतीने मांजा विक्री होत आहे. अशांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मांजाविक्री प्रकरणात पोलिसांकडून गु्न्हे दाखल केले जात असतानाही त्याची विक्री होत आहे.
दौंड शहरातील दोन तरुण व्यापारांवर गुन्हा दाखल
राज्यामध्ये मकरसंक्रांत सण उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी पतंग उडवून आणि तिळगूळ वाटून सण साजरा केला जातो. मात्र पतंग उडवताना बंदी असताना देखील नायलॉनचा मांजा वापरला जातो. या धारदार मांजामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. शेकडो पक्षी या नायलॉनच्या मांज्यामुळे जखमी होतात. यानंतर देखील अनेकजण हे नायलॉनचा मांजाची विक्री करत आहेत. दौंडमध्ये नायलॉनच्या मांजाची विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मकर संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा दुकानात ठेवून त्याची विक्री केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. प्रज्वल राम बनसोडे (वय २१ रा. जगदाळे वस्ती, दौंड, ता. दौंड) व मनोज सुभाष नय्यर (वय ४३, रा. शालीमार चौक, दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
हेही वाचा: बंदी असताना नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री; दौंड शहरातील दोन तरुण व्यापारांवर गुन्हा दाखल
पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिक, तसेच पक्ष्यांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शासनाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली आहे. असे असतानाही छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नायलॉन मांजाची रिळे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जगदाळे वस्ती व शालीमार चौकात मंगळवारी (दि. १४) दुपारी करण्यात आली . याप्रकरणी दोघांवर पर्यावरण (सरंक्षण) कायदा १९८६ च्या कलम ५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.