नायलॉन मांजा विकल्याप्रकरणी दौंडमधील दोन तरुणांवर पोलीस कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे (फोटो - सोशल मीडिया)
पाटस : राज्यामध्ये मकरसंक्रांत सण उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. दरवर्षी पतंग उडवून आणि तिळगूळ वाटून सण साजरा केला जातो. मात्र पतंग उडवताना बंदी असताना देखील नायलॉनचा मांजा वापरला जातो. या धारदार मांजामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. शेकडो पक्षी या नायलॉनच्या मांज्यामुळे जखमी होतात. यानंतर देखील अनेकजण हे नायलॉनचा मांजाची विक्री करत आहेत. दौंडमध्ये नायलॉनच्या मांजाची विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
मकर संक्रात सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा दुकानात ठेवून त्याची विक्री केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. प्रज्वल राम बनसोडे (वय २१ रा. जगदाळे वस्ती, दौंड, ता. दौंड) व मनोज सुभाष नय्यर (वय ४३, रा. शालीमार चौक, दौंड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिक, तसेच पक्ष्यांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शासनाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली आहे. असे असतानाही छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नायलॉन मांजाची रिळे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जगदाळे वस्ती व शालीमार चौकात मंगळवारी (दि. १४) दुपारी करण्यात आली . याप्रकरणी दोघांवर पर्यावरण (सरंक्षण) कायदा १९८६ च्या कलम ५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पोलिसांनी या दोघांच्या दुकानाची तपासणी केली असता प्रज्वल बनसोडे याच्या ताब्यातील ५हजार रुपये किमतीचा १० नॉयलॉन मांजा, तर नय्यर यांच्याकडून 3 हजार रुपयांचे 6 मंजाचे रोल असा एकूण 8 हजार रुपयांचा मांजा असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नितीन बोराडे व पवन माने यांनी फिर्याद दिल्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपूरमध्ये देखील घटना वाढल्या
नागपूर येथे देखील जोरदार पतंगबाजी झाली. मात्र यामध्ये नायलॉन मांज्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. पतंगाच्या मांजात फसून मंगळवारी 40 हून अधिक जणांना किरकोळ ते गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला. याशिवाय पतंगाचा मांजा गाडीत फसल्याने दुचाकीवरून पडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या व एकाचा रुग्णालयात नेत असतानाच एकाचा मृत्यू झाला आहे. मेयोत येथे दिवसभरात मांजामुळे जखमी झालेल्या 7 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.