पत्नीचा क्रुरावतार, झोपेतच पतीवर उकळतं तेल फेकलं; नंतर जखमांवर लाल तिखटही शिंपडलं (फोटो सौजन्य-X)
Delhi Crime News in Marathi: देशभरात दररोज अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या संदर्भातील घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. आता दिल्लीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळेत एका महिलेने तिच्या झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले. ती तिथेच थांबली नाही तर रागाच्या भरात जखमांवर मिरची पावडर शिंपडली. गंभीर भाजलेल्या पतीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये तो २८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे, तो जीवाशी झुंजत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
ही हृदयद्रावक घटना दिल्लीच्या मदनगीर परिसरात २ ते ३ ऑक्टोबर दरम्यान रात्री घडली. पीडितेचे नाव दिनेश असे आहे, जो एका औषध कंपनीचा कर्मचारी आहे. पोलीस तक्रारीनुसार, पहाटे ३ वाजताच्या सुमारास दिनेश झोपलेला असताना त्याची पत्नी साधना हिने त्याच्यावर गरम तेल ओतले. घटनेच्या वेळी त्यांची ८ वर्षांची मुलगीही तिथे होती. त्यानंतर तो मोठ्याने ओरडत होता, तरीही पत्नी त्याच्यावर गरम तेल ओतत होती आणि भाजलेल्या जखमांवर वरून लाल मिरची पावडर शिंपडत होती, असा आरोप त्याने केला आहे.
दिनेश म्हणाला, “माझी पत्नी आणि मुलगी जवळच झोपल्या होत्या. पहाटे ३:१५ वाजता अचानक माझ्या संपूर्ण शरीरात तीव्र जळजळ जाणवली. मी माझी पत्नी तिथे उभी असलेली पाहिली, ती माझ्या अंगावर आणि चेहऱ्यावर उकळते तेल ओतत होती. मी उठून मदतीसाठी हाक मारण्यापूर्वीच तिने माझ्या भाजलेल्या भागावर लाल मिरची पावडर शिंपडली. मी विरोध केला तेव्हा, जास्त आरडाओरडा केला तर आणखीन गरम तेल अंगावर ओतेने, अशी धमकीही साधनाने दिली.
जळजळ आणि वेदनांमुळे दिनेश ओरडू लागला तेव्हा शेजारी आणि खालच्या मजल्यावर राहणारे घरमालकाचे कुटुंब घरात आले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. घरमालकाची मुलगी अंजली म्हणाली, “दिनेशच्या पत्नीने आतून दरवाजा बंद केला होता. आम्ही तिला तो उघडण्यास सांगितले. शेवटी दार उघडले तेव्हा आम्हाला तो वेदनेने तडफडत होता आणि त्याची पत्नी आत लपलेली दिसली. त्याची पत्नी साधना हिने त्याला सांगितले की ती तिच्या पतीला रुग्णालयात घेऊन जात आहे. पण जेव्हा ती त्याच्यासोबत बाहेर आली तेव्हा ती विरुद्ध दिशेने गेली. आम्हाला संशय आला. माझ्या वडिलांनी तिला थांबवले, ऑटोची व्यवस्था केली आणि दिनेशला राम सागरसह रुग्णालयात घेऊन गेले.”
दिनेशला सुरुवातीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याच्या छातीवर, चेहऱ्यावर आणि हातावर खोलवर भाजलेले दिसल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सफदरजंग रुग्णालयात पाठवले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय अहवालात दिनेशच्या जखमा गंभीर भाजल्याचे वर्णन केले आहे. दिनेशच्या लग्नाला आठ वर्ष उलटून गेली आहे. दोन वर्षांपूर्वी दिनेशच्या पत्नीने महिला गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती, परंतु तडजोडीने हे प्रकरण मिटवण्यात आले. घटनेच्या दिवशी या जोडप्यामध्ये भांडण झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी पत्नीविरुद्ध भादंविच्या कलम ११८, १२४ आणि ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.