लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; राजस्थानहून संभाजीनगरमध्ये बोलावलं अन् नंतर... (फोटो सौजन्य- pinterest)
छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या आमिषाने अनेकांची फसणवूक झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्येही अशाच प्रकारची घटना घडली. मुलगी दाखवण्याचे आमिष दाखवून राजस्थान येथील तरुणाला तब्बल एक लाख 30 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
लग्न लावून देण्याच्या बहाण्याने आरोपी टोळीने राजस्थानहून तरुणासह त्याच्या कुटुंबाला संभाजीनगरमध्ये बोलावून घेतले. बनावट विवाह सोहळा पार पाडत पैसे उकळले आणि नंतर मुलगी व तिची साथीदार हॉटेलमधून पसार झाला. नजमा खान व तिचे साथीदार अशी फसवणूक करणाऱ्या टोळीची नावे असून, त्यांच्याविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दिलीपकुमार देवरामजी सेन (वय ३०, रा. पिनवाडा, सिरोई, राजस्थान) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी दिलीपकुमार हे सिरोई पीनवाडा (राजस्थान) येथे सलूनचे दुकान चालवतात.
हेदेखील वाचा : Tire Thief Gang Arrested: दौलताबाद येथे गुड इअर कंपनीच्या गोदामातून टायर चोरीचा पर्दाफाश; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
कोरोनात पत्नी निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी फिर्यादीचा भाऊ नरेश सेन मुलगी बघत होता. त्याच्या ओळखीतील छत्रपती संभाजीनगरातील फिरोज भाई आणि सलीम भाई यांनी मुलगी मिळेल, असे सांगून फिर्यादी कुटुंबाला संपर्क साधला. त्यानंतर सलीम याने नजमा खान हिचा नंबर फिर्यादीच्या कुटुंबाला दिला दिला. तिच्याशी संपर्क साधल्यानंतर तिने मुलीचे फोटो दाखवले, प्रत्यक्ष मुलगी बघायला त्यांना शहरात बोलावले. यानंतर राजस्थानहून ९ डिसेंबर रोजी दुपारी फिर्यादीचे कुटुंब बाबा पेट्रोलपंप येथे उतरले. येथेच नजमा खान व तिचे साथीदार यांनी त्यांना घेऊन हॉटेल पंजाब, रेल्वे स्टेशन परिसरात नेले.
पार पडला बनावट विवाहसोहळा
नजमा खान हिने फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांना अदिती विठ्ठल जगप्रताप (वय २५) हिचा फोटो दाखवून तिची ओळख सांगितली. त्यांनतर भरतनगर-वानखेडे नगर परिसरातील एका घरात मुलगी पाहणी घडवून आणली. मुलगी पसंत असल्याचे सांगताच नजमाने शगून म्हणून मुलीच्या हातात ५०० रुपये दिले. यानंतर नजमा खान हिने मुलीच्या घरच्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगत फिर्यादीकडून १ लाख ३० हजार रुपये घेतले. पुढच्या दिवशी नजमा खान व तिच्या साथीदारांनी अदिती आणि तिची मैत्रीण चंदा ह्यांच्या उपस्थितीत घरातच बनावट विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर नजमाने पुन्हा फिर्यादीकडे लग्नाचे राहिलेल्या पैशांची मागणी केली, त्यावर फिर्यादीने आणखी पैसे नसल्याचे सांगितले.
नवरी मुलगी मैत्रीणीसह मनमाडहून पसार
लग्नानंतर अदिती व चंदा यांना राजस्थानला पाठवण्याचा मोठा दिखावा करून त्यांना फिर्यादीसोबत मनमाडपर्यंत आणले. येथे उद्या सकाळी राजस्थानला जाऊ, असा खोटा बहाणा करून सर्वजण हॉटेलमध्ये थांबले. मात्र, मध्यरात्री साडेबारा वाजता दोन्ही मुली खोलीतून गायब झाल्या. फिर्यादीने नजमा खानला वारंवार फोन केले असता तिने फोन न उचलल्याने फसवणुकीचा संपूर्ण प्रकार उघड झाला. प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






