आता याला काय म्हणावं? घरफोडी करून जागरण गोंधळात उडवली रक्कम
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये अजब प्रकार समोर आला. यात चोरट्याने घरफोडी केली, दागिने चोरले आणि ते सोनाराला विकले. यातील रक्कम ‘जागरण गोंधळात’ उडवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी सुमारे २ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अरुण उर्फ आवड्या अभिमान काळे (वय २५, रा. पारनेर, पाटोदा जि. बीड) असे ताब्यातील आरोपीचे नाव आहे. २२ जानेवारीला खोडेगाव (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सोमीनाथ हुलसार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरुण उर्फ आवड्या हा संशयित असल्याचे पोलिसांना कळाले. हा आरोपी शहागड येथील जुन्या पुलावरून गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने चिकलठाणा येथील चोरीसह पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होनोबाची वाडी येथेही दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली.
चोरलेले 16 ग्रॅम सोने विकले सोनाराला
चोरलेले १६ ग्रॅम सोने त्याने शहागड येथील एका सोनाराला विकले होते. या सोन्यासह चोरीतील ५ हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. उर्वरित रक्कम त्याने ‘गोंधळ’ कार्यक्रमात खर्च केल्याचे तपासात समोर आले.
ज्यादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात फसवणुकीच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना नाशिकमध्ये आता कमी गुंतवणुकीत अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी काही गुंतवणुकदारांची तब्बल ६५ लाख ४४ हजार ८३७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.






