चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने केली महिलेची हत्या; रॉडने सपासप वार केले अन्... (फोटो सौजन्य : PINTEREST)
नागपूर : नागपुरातील दाभा परिसरात एका तरुणाने महिलेवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिची प्रकृती सुरूवातीपासूनच चिंताजनक होती. अखेर बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
हेमलता वैद्य (वय 32, रा. अंकाशी सोसायटी, दाभा) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी तरुणाला अमरावतीतून अटक केली. अक्षय दाते (वय 26) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चौकशीत त्याने चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याची कबुली दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुधवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.
आरोपी अक्षय हा मुळचा सावलीवाघ (हिंगणघाट) येथील रहिवासी आहे. कामानिमित्त तो नागपुरात आला. हेमलता ही सुद्धा मूळची सावलीवाघ येथीलच रहिवासी आहे. तिला एक 10 वर्षांची मुलगी आहे. पतीच्या मृत्यूनंतर ती नागपुरात आली. मागील काही वर्षांपासून दाभा परिसरात राहत होती. हेमलता आणि अक्षय यांची सीताबर्डीत खरेदी करताना पहिल्यांदा भेट झाली. तेव्हापासून दोघेही संपर्कात होते. तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबध होते. त्यांनी लग्न करण्याचेही ठरविले होते. मात्र, हेमलताच्या भावाचा लग्नाला विरोध होता.
कालांतराने होऊ लागली भांडणे
अक्षय आणि हेमलता यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली होती. अक्षय हेमलताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ती परपुरूषाशी बोललेली त्याला आवडत नव्हते. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद होत होते.
परपुरुषाशी बोलताना पाहून राग अनावर
मंगळवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हेमलता बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये खुर्चीवर बसली होती. ती एका पुरूषासोबत चर्चा करत होती. त्याचवेळी अक्षय तेथे आला. परपुरूषाशी बोलताना पाहून त्याचा राग अनावर झाला. त्याने जवळच पडलेल्या रॉडने तिच्यावर सपासप वार केले. तिला रक्तबंबाळ करून तो पळून गेला. महिलेला उपचारार्थ मेयोत दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हेमलताचा मृत्यू झाला.