फोटो सौजन्य- सोशल मीडिया
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याबद्दल नुकताच मालवण तालुक्यातील आचरा, तळाशील, कोळंब या गावात शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक पारंपरिक मच्छीमारांनी जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली.
पर्ससीननेट आणि एलईडीद्वारे केल्या जाणाऱ्या अनधिकृत मच्छीमारीविरोधात सुरु असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या लढयात आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छीमारांच्या खंबीरपणे पाठीशी राहिले आहेत. आमदार झाल्यापासून सातत्याने प्रत्येक अधिवेशनात पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न ते मांडत आहेत. अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाईसाठी स्वतः समुद्रात उतरून पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला त्यांनी बळ देण्याचे काम केले त्यामुळे मच्छिमार समाजाने देखील आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी रहावे. याउलट विरोधी उमेदवाराच्या पक्षातील लोकांचेच पर्ससीन आणि एलईडी ट्रॉलर्स आहेत. त्यामुळे अनधिकृत मासेमारी राजेरोसपणे केली जाते त्याला आळा घालण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार येणे गरजेचे आहे. असे माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी संगितले.
६५ कोटींचे पॅकेज तौकते वादळातील नुकसानग्रस्तांना मिळवून दिले
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम मी केले आहे. मच्छीमारांच्या वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मच्छिमारांच्या नौकांना आऊट बोट इंजिन दिले. चांदा ते बांदा योजनेतून अनुदानातून इन्सुलेटेड व्हॅन दिल्या. मच्छिमार वस्तीत दिवाबत्तीची सोय केली. समुद्र किनारपट्टी भागात कोट्यावधी रुपयांचे समुद्र धूप प्रतिबंधक बंधारे मंजूर करून प्रत्यक्षात कामे सुरु केली तर काही ठिकाणी बंधारे पूर्ण झाले आहेत. मस्त्य जेटीची उभारणी केली,गावातील ग्रामस्थांची मागणी असलेली रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. तौकते चक्रीवादळात स्वतः मदतकार्य केले त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना नुकसानीची पाहणी करण्यास मालवणात आणून त्यांच्याकडून तब्बल ६५ कोटींचे पॅकेज तौकते वादळातील नुकसानग्रस्तांना मिळवून दिले होते.
मतदारसंघात होणार अटीतटीची लढत
कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान आमदार वैभव नाईक विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निलेश राणे अशी अटीतटीची लढत होणार आहे. 2014 साली नारायण राणे यांना पराभूत करत जायंट किलर ठरलेल्या वैभव नाईक यांनी 2019 मध्येही या मतदारसंघातून निवडणूक जिंकली. यावेळी मात्र त्यांच्यासमोर निलेश राणे यांच्याकडून कडव आव्हान दिले जात आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक हे यावेळी निलेश राणेंना टक्कर देऊन हॅट्ट्रीक साधतात का हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.