महायुतीच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये नवीन सरकार तयार होणार असून महायुतीचा शपथविधीचा सोहळा होणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा असून राज्यासह देशभरातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ धेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शपथविधी सोहळ्याबरोबर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख देखील समोर आली आहे.
आझाद मैदानावर होणाऱ्य़ा शपथविधी सोहळ्यामध्ये फक्त तीनच नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये महायुतीचे चेहरे असणारे देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय महायुतीमध्ये इतर खाती कोणत्या नेत्यांना मिळणार हे गुलदस्त्यामध्ये आहे. मागील सरकारप्रमाणे खाते वाटप होणार की नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार याची उत्सुकता लागली आहे. याबाबत बोलताना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची थेट तारीख जाहीर केली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीचे सर्व नेते व आमदार मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये सिद्धीविनायक गणपतीचे तसेच मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भरत गोगावले बोलले की, “आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीसाठी दिलेला वेळ कमी आहे. त्यामध्ये एवढ्या सगळ्यांचे शपथविधो होणार नाहीत. त्यामुळे महायुतीच्या आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यामध्ये फक्त तिघांचा शपथविधी होईल,” अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे.
थेट सांगितली तारीख
महायुतीच्या खातेवाटपामध्ये कोणते खाते कोणत्या पक्षाला मिळाले हे समोर आलेले नाही. मात्र राज्यात लवकरच हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाचे लक्षात घेता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. भरत गोगावले यांनी थेट तारीख जाहीर केली आहे. गोगावले म्हणाले की, “महायुतीमध्ये इतर कोण मंत्री शपथ घेतील यांची काही आम्हाला कल्पना देण्यात आली नाही. आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शपथ घेतील तर बाकीचे 11 तारखेपर्यंत शपथ घेतील शिवसेनेला किती मंत्री पद मिळतील यांची चर्चा तीनही मंत्र्यांमध्ये सुरु आहे. एकनाथ शिंदे जे काही करतील ते पक्षहितासाठी करतील. आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे शिंदेंनी मंत्रीमंडळात राहावं,” असे मत भरत गोगावले यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी थेट मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगितली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या शपथविधीवरुन जोरदार टीका केली. “एकनाथ शिंदे १०० टक्के आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यात शपथ टाळण्याची हिंमत आहे का हे तपासावं लागेल. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर भरत गोगावले म्हणाले की, संजय राऊत यांनी बोलतच राहावं कारण ते जे बोलतात त्यांच्या नेहमी उलट होतं. कोण संपेल आणि कोण राहिल ते जनतेने दाखवलं आहे. संजय राऊत यांनी डोळे झाकले आहेत,” असा घणाघात शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी केला आहे.