महायुतीच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन (फोटो - सोशल मीडिया)
बारामती : राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणूकीचा निकाल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला. यानंतर अखेर 12 दिवसांनंतर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. आझाद मैदानावर सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर भाजपचे पक्षश्रेष्ठी देखील सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीप्रमाणे विरोधातील नेत्यांना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
महायुतीचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून तीन नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. आता फक्त या तीन नेत्यांचा शपथविधी होणार आहे. राजशिष्टाचारनुसार, या सोहळ्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार व माजी मुख्यमंत्री शरद पवार आणि मनसे नेते राज ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रण देण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी फोन देखील केला आहे. आमंत्रणासाठी फडणवीसांनी शरद पवारांना फोन केला होता. मात्र शरद पवार व सुप्रिया सुळे हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील सोहळ्याला जाणार नसल्याचे समोर आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला वैयक्तिक कारणांमुळे उपस्थित राहू शकत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता महायुतीच्या नेत्याव्यतिरिक्त कोणते नेते उपस्थित राहणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
महायुतीमध्ये एकतर्फी निकालानंतर नाराजीनाट्य सुरु असल्याचे दिसून आले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांनी केलेल्या गृह खाते व नगर विकास खाते यांची मागणी भाजपने मान्य केली नाही. आता एकनाथ शिंदे हे शपथविधी सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. एनडीएचे नेते रामदास आठवले यांनी याबाबत सूचक विधान केले आहे.