वडगाव मावळ मतदारसंघामध्ये आमदार सुनील शेळके यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार प्रचार सुरु आहे. वडगाव मावळमध्ये देखील प्रचाराचा धुराळा उडाला आहे.
मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांची जनसंवाद यात्रा सुरु आहे. त्यांच्या या यात्रेला वाकसई व कार्ला परिसरामधील गावांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. गावोगावी नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांचे जोरदार स्वागत केले. महिला भगिनींनी औक्षण करत आमदार सुनील शेळके यांना विजयाचा विश्वास दिला. तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा उत्स्फूर्त असा सहभाग या जनसंवाद यात्रेत पाहायला मिळाला.
मुंढावरे गावांमधून या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. पुढे फांगणे वसाहत, टाकवे, शिलाटणे, दहिवली, वेहेरगाव, कार्ला, सदापूर, वरसोली, वाकसई चाळ, वाकसई गाव, देवघर, करंडोली, जेवरेवाडी या गावांमध्ये सोमवारी ही जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती.
आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आई एकविरा देवीच्या मंदिर परिसराचा व कार्ला लेणीचा विकास करण्यात आला आहे.
मागील पंधरा ते वीस वर्षापासूनची मागणी असलेला कार्ला मळवली दरम्यानचा इंद्रायणी नदीवरील पूल याचे नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. यासह विविध गावांमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या निधीमधून विकास कामे करण्यात आली आहेत. यामुळे आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी या सर्व भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक उभे असल्याचे चित्र या जनसंवाद यात्रेच्या निमित्त पाहायला मिळाले.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा अन्यथा…; ‘आप’ने दिला इशारा
आमदार सुनील शेळके यांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये महिला, भगिनी, मुले, ज्येष्ठ नागरिक, तरुण हे आतुरतेने थांबत असल्याचे चित्र दिसून आले. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांची ही पोच पावती असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर प्रत्येक गावात निधी देताना जातीपातीचा व पक्षाचा विचार न करता विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवत निधी देण्याचे काम केले. येणाऱ्या काळामध्ये आई एकवीरा देवीच्या पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत या सर्व परिसरातील गावांना रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेमध्ये एक मोठा प्रकल्प येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे सुनील शेळके म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेवणारे लोहगड, विसापूर हे किल्ले तसेच भाजे लेणी, कार्ला लेणी या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करत त्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना देत या भागामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू आहे. विरोधकांकडून माझ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. माझे स्टेटस ठेवू नका, माझ्या पोस्ट टाकू नका अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असलेला सुनील शेळके तुम्ही कसा बाहेर काढणार. मायबाप जनतेला धमक्या देऊन नाही तर प्रेमाने आत्मसात करत त्यांच्यासाठी दिवस-रात्र काम करणारा लोकप्रतिनिधी हवाय म्हणूनही जनता आज माझ्या पाठीशी ठामपणे उभी अआहे. ज्यावेळी या सर्वसामान्य जनतेला तुमच्या आधाराची गरज होती त्यावेळी तुम्ही मी व माझे कुटुंब म्हणत घरामध्ये लपून बसला होता. हे जनता कधीही विसरणार नाही,” असे सुनील शेळके म्हणाल आहेत.