विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीची बाजू घेतली आहे. (फोटो - फेसबुक)
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधुम आहे. एकीकडे जोरदार प्रचार तर दुसरीकडे राजकीय खेळी सुरु आहेत. नेत्यांमध्ये अद्याप खलबत सुरु आहेत. मागील अनेक महिन्यांपासून एकनाथ खडसे यांच्याबाबत राजकीय भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता. आता अखेर एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीची बाजू घेतली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निवडणूक रंगणार आहे. मात्र यामध्ये महाविकास आघाडीच विजयाचे फटाके फोडणार, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले. आता एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना टोला लगावला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, सध्या राज्यात महागाई आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळं जनता त्रस्त झाली आहे. जनता महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देईल. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कौल मिळेल आणि महाविकास आघाडीचे फटाके फुटतील, असे त्यांनी म्हटले. तर मागील निवडणुकीमध्ये रोहिणी खडसे यांचा 1800 मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवाच्या कारणांचा आम्ही शोध घेतला असून या निवडणुकीमध्ये असं होणार नाही, असा विश्वास देखील एकनाथ खडसेंनी व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : राहुल गांधींची अनोखी दिवाळी! कष्टकऱ्यांच्या घरी काम करून बनवल्या मातीच्या पणत्या
त्यांच्या या विधानानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यामधील राजकीय वादंग सर्वश्रूत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये वाद विवाद सुरु झाले आहेत. एकनाथ खडसे यांच्या टीकेला गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, नंतर फटाके फोडू यामध्ये अडचणी काय, फटाके फोडायची आणि लावायची फार घाई करू नका, असा टोला त्यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे काय प्रतिक्रिया देणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळामध्ये लागली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. एकनाथ खडसे यांनी या चर्चांना दुजोरा देत लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले. मात्र भाजपमधील काही नेत्यांना एकनाथ खडसे यांची ही घरवापसी नको होती. यासाठी खडसे यांनी थेट दिल्ली देखील गाठली होती. मात्र त्यांचा भाजप प्रवेश होत नव्हता. त्यामुळे एकनाथ खडसे हे नक्की भाजपचे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असा प्रश्न पडला होता. एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री झाल्यानंतर तरी हा पक्षप्रवेश होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तरी एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झाला नाही. आता एकनाथ खडसे यांनी महाविकास आघाडीची बाजू घेतल्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये असल्याचे अधोरेखित झाले आहेत.