महाराष्ट्र सरकार स्थापनेमध्ये अपक्ष आमदार निभावणार किंग मेकरची भूमिका (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राज्यभरामध्ये साधारणतः 65.11 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सकाळी 7 पासून सायंकाळपर्यंत मतदारांच्या मोठ्या रांगा मतदान केंद्राबाहेर होत्या. मतदानानंतर आता एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. आता महायुतीच्या नेत्यांनी 145 आमदारांचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत महायुतीच्या नेत्यांनी मांडले आहे.
राज्यामध्ये यंदाची विधानसभा निवडणूक जोरदार गाजली. बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्वांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. त्यामुळे आता जनतेने कोणाला कौल दिला याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. मतमोजणी आणि निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी हाती येणार आहे. त्यापूर्वी राजकीय नेत्यांची जुळवाजुळवी सुरु आहे. सरकार स्थापनेबाबत महायुतीचे व शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “महायुती आम्ही सरकार स्थापन करुच. पण सरकार स्थापन करण्याच्या जवळ असताना अपक्षाची आवश्यकता असते तेव्हा अपक्ष हा सत्ता येणाऱ्या युतीच्या बाजूने तो कल देत असतो. त्यामुळे महायुतीची सत्ता ही पूर्ण बहुमतामध्ये येणार आहे. जर दोन चार अपक्ष आमदारांची गरज असेल तेव्हा आम्ही सहकार्य घेऊ,” अशी भूमिका संजय शिरसाट यांनी घेतली आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी शिंदे गट देखील अपक्ष आमदारांची मदत घेणार आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
सरकार स्थापनेबाबत शिंदे गटाचे नेते व मंत्री दीपक केसरकर यांनी देखील वक्तव्य केले आहे. दीपक केसरकर म्हणाले की, “विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलमधून 10 ते 15 अपक्ष आमदार निवडून येणार आहेत. करताना एक्झिट पोलने अपक्ष आमदाराबाबत केलेल्या दाव्यानुसार गरज पडल्यास सत्तास्थापनेसाठी महायुती अपक्षांची मदत घेणार,” असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सध्या तरी मतदानानंतर आणि निकालाच्या पूर्वीच अपक्ष आमदारांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे. एक्झिट पोलनुसार, महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे जादुई आकडा गाठण्यासाठी युतींना अपक्ष आमदारांची साथ हवी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार स्थापनेमध्ये अपक्ष आमदार हे ‘किंगमेकर’ ठरणार आहेत.