पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे पहाटे साडे तीन वाजता निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. मंगळवार (दि.६) दुपारी दोनपर्यंत त्यांचे पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सुरेश कलमाडी यांचे नाव फक्त पुण्याच्या नाहीतर देशाच्या राजकारणातही घेतले जात होते. त्यांनी राजकारणात अनेक पदे भूषवली होती. लोकसभेत पुण्याचे प्रतिनिधित्व केलेले सुरेश कलमाडी हे दिल्लीतील नेत्यांशी असलेल्या जवळीकतेमुळे अधिक परिचयाचे होते. पुण्याच्या राजकारणात आग्रहाने त्यांचे नाव घेतले जात होते.
सुरेश कलमाडी यांनी केंद्रातही मंत्रिपद भूषवले होते. पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात सुरेश कलमाडी यांनी १९९५ ते १९९६ पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षही होते. ३ ते १४ ऑक्टोबर २०१० दरम्यान दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अर्थात कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजन समितीचे अध्यक्षही होते.
1978 मध्ये प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष
सुरेश कलमाडी हे १९७८ ते १९८० दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते १९८२ ते १९९५ आणि पुन्हा १९९८ मध्ये तीन वेळा राज्यसभेचे सदस्य राहिले. १९९६ मध्ये ११ व्या लोकसभेवर आणि २००४ मध्ये १४ व्या लोकसभेवरही ते निवडून आले. पुण्याचे माजी खासदारही होते. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या भारताच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुरेश कलमाडी यांनी १९९५ ते १९९६ पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
काँग्रेसशी एकनिष्ठ अशी ओळख
सुरेश कलमाडी यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला. ते एक भारतीय राजकारणी आणि वरिष्ठ क्रीडा प्रशासक होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे सदस्यही होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ अशी त्यांची ओळख होती. ते भारतीय ऑलिंपिक संघटना, आशियाई अॅथलेटिक्स संघटना आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षही राहिले होते.
हेदेखील वाचा : Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद






