प्रमोद जठार खासदार झाले तर राणेंची या जिल्ह्यावरील जी मक्तेदारी आहे, ती कुठेतरी संपुष्टात येईल. राणेंची घराणेशाही संपून प्रमोद जठार यांच्यासारखा सर्व सामान्य कार्यकर्ता खासदार होईल. या भीतीने राणेंनी त्यांना विरोध केला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी खासदारकी मिळवली. राजकारणमध्ये आम्ही उतरलेले आहोत. परिणामांची चिंता आम्ही कधीच करत नाही. जे काय असेल त्या लढाईत आम्ही लढण्यासाठी नेहमी सज्ज असतो. त्यामुळे आमदार नितेश राणे यांना त्यांचा पराभव त्यांच्या नजरेसमोर दिसत आहे. पराभवाची भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून त्यानी माझ्यासमोर माझ्या मतांमध्ये विभागणी व्हावी, यासाठी संदेश परकर नावाचा अपक्ष उमेदवार व मुस्लिम उमेदवार नितेश राणेंनी उभा केल्याची टीका , शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.
कणकवली येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले , नितेश राणे यांनी आपल्या माध्यमातून मुस्लिम खानी उमेदवार उभा केला आहे. मात्र , त्यांना मुस्लिम समाजाची मते त्यांना मिळणार नाहीत. मुस्लिम मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे सारे प्रयत्न ते असफल ठरतील. माझ्या विरोधात पराभवाची भिती असल्याने संदेश परकर नावाचा उमेदवार देण्यात आला आहे.
राणेंनी स्वत:चा स्वार्थ साधत प्रमोद जठारांची तिकीट कापली
लोकसभा निवडणूकीत प्रमोद जठरांची राजकीय फसवणूक झालेली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांना प्रवेश देऊन प्रमोद जठरांचे वर्चस्व बाजूला केले गेले. आणि नितेश राणे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. प्रमोद जठार सर्व बैठकांमध्ये, सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये सांगत होते की, लोकसभेची निवडणूक आपण लढणार आणि त्यासाठी आपल्याला नारायण राणे यांचा पाठिंबा आहे. परंतु राणेंना जेव्हा स्वतःचा स्वार्थ दिसला त्यामुळे प्रमोद जठार यांची तिकीट कापण्यात आल्याची टीका संदेश पारकर यांनी केली.
कणकवली मतदारसंघ
कणकवली मतदारसंघात मागील दोन निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार नितेश राणेंनी बाजी मारली आहे. 2014 मध्ये ते कॉंग्रेसकडून आमदार झाले तर 2019 मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक जिंकली. त्या अगोदर 2009 साली प्रमोद जठार हे भाजपचे आमदार होते. 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती असतानाही शिवसेनेने या जागी उमेदवार दिला होता. आता मात्र कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात थेट लढत आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक ही राज्याचे लक्ष वेधणारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार नारायण राणे यांना या मतदारसंघातून चांगले मताधिक्क्य मिळाले होते. मात्र हे मत्ताधिक्क्य नितेश राणेंच्या पारड्यात जाणार का यावरच निकाल अबलंबून आहे.