महायुतीच्या शपथविधी सोहळ्यावरुन खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले. महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील सत्ता स्थापनेला विलंब होत असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. आता निकालाच्या 12 दिवसांनंतर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यामुळे यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. ते 100 टक्के आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांच्यात शपथ टाळण्याची हिंमत आहे का हे तपासावं लागेल. दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही. कारण अडीच वर्षांपूर्वी ती हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पक्ष सोडला. आज तिघांनी शपथ घेतली, तर उरलेलं मंत्रीमंडळ स्थापन करण्यासाठी त्यांना बराच वेळ मिळतो. त्यांना मंत्रीमंडळात राहावंच लागेल. सत्तेशिवाय काही माणसं राहू शकत नाहीत”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या राजकीय भविष्याबाबत देखील वक्तव्य केले. अजित पवार हे केंद्रामध्ये राजकारण करतील असे भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, “अजित पवारांचं राजकारण वेगळं आहे. त्यांनी दिल्लीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलं आहे अशी माझी पक्की माहिती आहे. त्यांच्यावर विशिष्ट अशा जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, तेही मला माहिती आहे, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे अजित पवार हे दिल्लीमध्ये राजकारण करणार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीप्रमाणे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण यावेळी राऊतांनी त्यांना टोला देखील लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा आहेत. पण राज्य लूट न होण्याची जबाबदारी तुमची असेल. मागच्या अडीच वर्षात राज्यातील संपत्तीवर दरोडे पडले ते थांबले पाहिजे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमंत्रण
महायुतीच्या शपथविधीसाठी 19 राज्यांच्या मुख्यंमत्र्यांना आणि अनेक बड्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा होणार आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महायुतीचे राज्यातील सर्व आजी-माजी आमदार, खासदारही उपस्थित राहणार आहे. अशातच महायुतीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचेही सांगितले जात आहे.