फोटो - सोशल मीडिया
मुंबई : राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. विधानसभेचा निकाल हा पूर्णपणे महायुतीच्या बाजूने लागला आहे. बहुमतापेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून देखील अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. विधानसभेचा कार्यकाल संपला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आता त्यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा देखील सोडला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार उलथापालथ होत आहे. यामध्ये राज्य सरकारचा शपथविधी सोहळा कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
महाराष्ट्राचे राजकारण जोरदार रंगले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्य मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच झाल्याचे दिसले. मात्र नंतर अजित पवार यांनी माघार घेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली. तर एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल. तसेच समाधानी असल्याचे देखील शिंदे म्हणाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी तिन्ही नेते दिल्लीला गेले आहेत. त्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना शपथविधीची थेट तारीख सांगितली.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय म्हणाले अजित पवार?
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “दिल्लीला महायुतीचे तिन्ही नेते जाणार आहेत. आम्ही यासर्व विषयांवर चर्चा करणार आहोत. राज्यामध्ये पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्री असे सरकार स्थापन होईल. या महिन्याच्या शेवटपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल. 30 नोव्हेंबरला किंवा 1 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होईल,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना शरद पवार गटातील आमदार संपर्कामध्ये असल्याबाबत विचारणा करण्यात आली. शरद पवार गटाचे आमदार संपर्कात आहेत का असा सवाल करताच अजित पवार म्हणाले की, “निकालाला अजून 3 दिवसच झाले आहेत. अजून कशातच काही नाही. माझ्या संपर्कामध्ये कोणीही नाही. विजयी झालेल्या आमच्या आमदारांची बैठक घेतली. जे पराभूत झाले त्यांच्याशी देखील संवाद साधला. सर्व रितसर कामं सुरु केली आहेत. मतदारांचे आभार विजयी आमदारांना मानायला सांगितले आहे,” असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एकनाथ शिंदेंनी सोडला दावा
सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीमधील मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितले की,” राज्यात मिळालेला हा सर्वात मोठा विजय आहे. मी कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षांच्या कार्यकाळात मी खूप समाधानी आहे. म्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे आहोत. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रसाठी काम करेन. मी काहीही ताणून ठेवलेले नाही. मी काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी अंतिम आहे. सत्तास्थापनेसाठी आमच्याकडून कोणतीही अडचण होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असेल, ” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.