मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून अवघ्या एका महिन्यावर निवडणूका आल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी नवीन सरकार स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यापूर्वी उमेदवारी एक यादी जाहीर करण्यात आली होती. आता ठाकरे गटाने 15 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपामध्ये महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला चर्चेचा जास्त वेळ लागला. त्यामुळे शरद पवार गट, ठाकरे गट व कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार अगदी नंतर जाहीर होत आहेत. यापूर्वी ठाकरे गटाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यातील अनेकांनी शक्तीप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटाने त्यांच्या पक्षातील दुसरी यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आणखी 15 जणांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे.
कोणाला मिळाली संधी?
ठाकरे गटाने जाहीर केलेल्या या दुसऱ्या यादीमध्ये 15 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये शिवडीमधून अजय चौधरी, धुळे शहरमधून अनिल गोटे, चोपडामधून राजू तडवी, जळगाव शहरमधून जयश्री सुनील महाजन, बुलढाणामधून जयश्री शेळके, दिग्रसमधून पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोलीमधून रूपाली राजेश पाटील, परतूरमधून आसाराम बोराडे, देवळालीमधून योगेश घोलप, कल्याण पश्चिममधून सचिन बासरे, कल्याण पूर्वमधून धनंजय बोडारे, वडाळामधून श्रद्धा श्रीधर जाधव, भायखळामधून मनोज जामसुतकर, श्रीगोंदामधून अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवलीमधून संदेश भास्कर पारकर यांनी ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे.
ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढत
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. अनेक मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत दिसून येणार आहे. महाविकास आघाडीमधून देखील शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट व कॉंग्रेस हे एकत्रितपणे पहिल्यांदाच विधानसभेला सामोरे जात आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये अनेकदा शीतयुद्ध होताना दिसत आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रंगणार हे निर्विवाद आहे.