Photo Credit - Social Media
इस्लामपूर : आमदार जयंत पाटील यांना 35 वर्षात मतदारसंघाचा चौफेर विकास साधता आला असता. परंतु, त्यांनी आपलेला मिळालेल्या पदाचा व सत्तेचा वापर फक्त त्यांना राजकारणात ओव्हरटेक करणाऱ्यांची जिरवा-जिरवी करण्यासाठी त्यांना राजकारणातून कायमचे संपवण्यासाठी व दुसर्याच्या संस्था लुटण्यासाठी केला. आजपर्यंत ते फक्त गलिच्छ राजकारण करत आले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
हेदेखील वाचा : ‘भाजपमध्ये कार्यकर्त्यांनाही दिली जाते उमेदवारी, पण काँग्रेसमध्ये…’; नितीन गडकरी यांची टीका
आष्टा येथे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आनंदराव पवार यांच्यासह प्रमुख नेतेमंडळी उपस्थिती होती. अजित पवार म्हणाले, ‘स्व. विलासराव शिंदे यांच्या बरोबर मी काम केले आहे. त्यांनी या भागाचा विकास केला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून पुढे जात आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो. आता आमच्या चुका आम्ही सुधारल्या आहेत’.
तसेच शेतकरी हा माझ्या देशाचा कणा आहे. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही पाऊले उचलली. येथील लोकप्रतिनिधीना 35 वर्षे तुम्ही निवडून दिले. पण त्यांना येथे एमआयडीसी उभारता आली नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देता आला नाही. इस्लामपूर व आष्टा बसस्थानकाची काय अवस्था आहे ही मी सांगायची आवश्यकता नाही, तुम्हाला तालुक्यातील महापुरुषांची स्मारके करता आली नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
…अन् तुम्ही मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघता
रिकव्हरीप्रमाणे दर द्यायचा झाला तर 3800 रुपये टनाला येथील शेतकर्याला मिळायला पाहिजेत. दिवाळी सर्वांना सोबत घेऊन गोडधोड करायची असते. स्वतःच करून खायची नसते. तुम्हाला साधी मतदारसंघातील लोकांची दिवाळी साजरी करता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने बघता. ऊस दर देण्यात स्पर्धा असावी. व्यक्तिगत स्वार्थ साधणारी स्पर्धा नसावी. तुम्ही जलसंपदामंत्री होता. तुमच्या मतदारसंघातून नदी गेली आहे. तरीही तुम्हाला जनतेला पाणी देता आलं नाही, हे येथील लोकांचे दुर्देव आहे.
निशिकांतदादांना या निवडणुकीत निवडून द्या
मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो. निशिकांतदादांना या निवडणुकीत निवडून द्या. आम्ही पहिले स्व. विलासराव शिंदे साहेबांचे स्वप्न असणारी भुयारी गटर योजना मार्गी लावून आरोग्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकू. एमआयडीसीची निर्मिती करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ. बारामतीपेक्षा चांगला विकास करण्यासाठी निधीची कमरतात पडू देणार नाही. इस्लामपूर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदला नाहीतर पवार नाव सांगणार नाही.
फक्त एका नेत्याच्या विरोधामुळे…
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, येथे एका नेत्याच्या विरोधामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा राहिला नाही. 1978 ला स्व. राजारामबापू पाटील यांच्या पराभवामुळे हे शहर विकासापासून जाणून बुजून वंचित ठेवले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही आण्णा भाऊ साठे व स्व. विलासराव शिंदे यांचा पुतळा बसवण्यासाठी मी पाठपुरावा करेन. स्व. शिंदेसाहेब यांनी हा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी संघर्ष संपवला. पण विरोधकांनी त्यांना शेवटपर्यंत त्रास देण्याचा प्रयत्न केला.
हेदेखील वाचा : बांगलादेश पुन्हा अस्थिरतेच्या दिशेने?; शेख हसीना यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आज उतरणार रस्त्यावर