शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून जागावाटप व उमेदवार जाहीर केले जात आहे. उमेदवार जाहीर करण्यामध्ये महायुतीने बाजी मारली असली तरी आज महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार जाहीर झाले आहेत. ठाकरे गट व कॉंग्रेसनंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षांची दुसरी यादी जाहीर करत अनेक महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केले आहेत.
जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातील दोन जागांवर शरद पवार गटातील उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून असणार आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सचिन दोडके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परांडा विधानसभा मतदारसंघ राहुल मोटेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाने देखील उमेदवार दिलेला आहे. परांडामधून ठाकरे गटाने रणजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे परांडा विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची दुसरी यादी
शरद पवार गटाने दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये अजित पवार गटाच्या उमेदवारांविरोधात तगडे उमेदवार देण्यात आले आहेत. अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात सुनीता चारोसकर यांना उमेदवारी दिली आहे. तर माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात येवलामधून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यशील शेरकर यांना जुन्नरमधून अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.