विधीमंडळामध्ये केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमण यांनी देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन केले. (फोटो - एक्स)
मुंबई : राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीकडून गटनेतेपदी एकमताने देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता महायुतीचे नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्यामुळे भाजप नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या भाजपच्या बैठकीमध्ये भाजपचे दोन केंद्रीय नेते निरिक्षक म्हणून आले होते. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेता निवडीसाठी निरीक्षक म्हणून केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे महाराष्ट्रामध्ये आले होते. देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर त्यांनी संवाद साधला आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस होऊन गेले आहेत. मात्र तरी देखील महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असला तरी त्यांनी इतर दोन महत्त्वांच्या खात्यांची मागणी केली होती. ही मागणी भाजपला मान्य नसल्यामुळे सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला आधीच विलंब होत होता. महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी बहुमत मिळाल्यानंतर आणि विधानसभेची मुदत संपली तरी देखील सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत नव्हता. यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले होते. यानंतर भाजपने थेट केंद्रातून दोन निरिक्षक पाठवून विधिमंडळ पक्षाच्या गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली. यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
विधीमंडळामध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर काँग्रेसला टोला देखील लगावला आहे. निर्मला सितारमण म्हणाल्या की, “नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा. या निवडणुकीत महाराष्ट्रातील 14 कोटी जनता जर्नादनचा निर्णय हा संपूर्ण भारतासाठी संदेश आहे. ही नेहमीप्रमाणे विधानसभा निवडणूक नव्हती. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील ही निवडणूक त्याआधी हरियाणाची निवडणूक यातून जनतेचा संदेश स्पष्ट आहे. हे अभूतपूर्व यश हा विकसित भारतासाठी संदेश आहे, असे म्हणत निर्मला सितारमण यांनी अभूतपूर्व विजयाबद्दल भाजपचे पक्षश्रेष्ठी, नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
पुढे त्यांनी काँग्रेसला खोचक टोला देखील लगावला आहे. सितारमण म्हणाल्या की, “लोकांनी त्यांच्या अनुभवानुसार काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकार त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या कामात व्यत्यत आला होता. त्यामुळे लोक वैतागले होते. त्यामुळे राज्यात काय चाललंय असं लोकांच्या मनात होतं. त्यामुळेच त्यांनी हा कौल दिला आहे. त्यामुळे हा कौल तुम्ही योग्य पद्धतीने पुढे न्याल. डबल इंजिनचं सरकार मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या भविष्यासाठी पुढे घेऊन जाताल,” असे मत निर्मला सितारमण यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “निवडणुकीतील घोषणा तुम्ही पूर्ण कराल. राज्यातील काँग्रेसच्या काळातील सरकारमध्ये जनतेचं कसं नुकसान झालं हे लोकांना दाखवून आपल्याला पुढे जायचं आहे. शेतकरी, उद्योग आणि कोणत्याही क्षेत्रातील कामे असतील ती पुढे न्यायची आहेत. एआयमध्ये आपले तरुण स्टार्टअपसाठी मोठं योगदान देत आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणखी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे स्टार्टअपमध्ये आपण मोठं योगदान देऊ शकतो,” असे मत निर्मला सितारमण यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये व्यक्त केले आहे.






