File Photo : Nitin Gadkari
मंगळवेढा : लोकसभेत भाजप 400 जागा निवडून आल्यावर संविधान बदलतील, असा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत अपप्रचार केला होता. संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही संविधान बदलणार नाही व कुणाला बदलूही देणार नाही. याउलट डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला उध्वस्त करण्याचे व तोडण्याचे पाप हे काँग्रेसचेच आहे, असा हल्लाबोल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर केला.
हेदेखील वाचा : राज्यात बॅग्स तपासणीचा मुद्दा तापला; कराड विमानतळावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगेची तपासणी
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ सभेत गुरुवारी ते मंगळवेढा येथे बोलत होते. यावेळी अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. मंत्री गडकरी पुढे म्हणाले, ‘दलितांच्या मनामध्ये विष कालवून त्यांना भडकविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपवाले खतरनाक आहेत. सुरक्षित राहायचं असेल तर काँग्रेसला मत द्या, अशी ओरड काँग्रेस नेहमी करत असते. पण भारत सरकारच्या आता ६७ योजना आहेत. यापैकी एखाद्या योजनेत अशी अट आहे काय, की दलित आणि मुस्लिमांनी अर्ज करू नये? भाजपने कधीच भेदभावाचे काम केले नाही’.
तसेच ‘सब का साथ, सबका विकास’ हेच आमचे सूत्र आहे. जो मतदान देईल त्याचं काम करू, जो देणार नाही त्याचंही काम करू. जातीवादाचे राजकारण आम्ही करणार नाही. हा देश बदलला पाहिजे. प्रत्येक गावाला पाणी, रस्ते, शेतीला चांगला दर मिळाला पाहिजे. तरुणांच्या हाताला काम पाहिजे, गावात शाळा चांगल्या पाहिजेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागात रस्त्यांची कामे झाली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हे धोरण राबविल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
काँग्रेसच्या काळात झाला नाही ग्रामीण भागाचा विकास
शिक्षण, आरोग्य, रस्ते यासाठी प्राधान्याने काम करत आहे. काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. जनतेला लुटाचे काम फक्त त्यांनी केले. शेतकरी आत्ता अन्नदाता बरोबर इंधनदाता झाला आहे. शेतकऱ्यांना तयार केलेल्या इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या सुरू केल्या. अनेक कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या टू व्हीलर गाड्या बाजारात आणत आहेत.
गावे समृद्ध व संपन्न झाली तर…
इथेनॉलचा फायदा शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यावर होणार आहे. गावे समृद्ध व संपन्न झाली तर बाहेरच्या शहरात कामासाठी जाण्याची गरज भासणार नाही. भाजपने टेंभू म्हैसाळ प्रकल्प मार्गी लावले. त्यामुळे मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले.
महाराष्ट्राचे चित्र बदलायचे असेल तर भाजपला निवडून द्या
याशिवाय, देशात उत्पादन वाढून खर्च कमी करून चांगला दर दिला पाहिजे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे चित्र बदलायचे असेल तर भाजपला निवडून द्या, असे म्हणत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मतदारांना साद घातली.