(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मुंबई – नेहरू सेंटर, वरळी येथे इंडिया आर्ट फेस्टिव्हल पुन्हा एकदा दिमाखात भरत आहे. देश-विदेशातील कलावंतांना एकत्र आणणाऱ्या या महोत्सवात भारतीय कलाकारांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण कलाकृतींचे दर्शन प्रेक्षकांना मिळणार आहे.
भारतीय कला महोत्सवाची मुंबईतील ही १४ वी, तर देशपातळीवरील ३७ वी आवृत्ती आहे. या महोत्सवाचा मूळ उद्देश स्वतंत्र चित्रकार आणि कलादालने यांचा एकत्रित मंच निर्माण करणे हा आहे, ज्यामुळे कलाक्षेत्रातील विविधतेला सन्मान मिळतो. मागील पंधरा वर्षांपासून कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात महोत्सवाचे स्थान वाढत चालले असून, मुंबईसह दिल्ली, बंगलोर, हैदराबाद आणि इतर शहरांमध्येही या महोत्सवाने विशेष स्थान मिळवले आहे. यामुळे इंडिया आर्ट फेस्टिव्हल कला प्रेमींमध्ये प्रतीक्षेत राहणारा उत्सव ठरला आहे.
या महोत्सवात पेंटिंग, शिल्पकला, आधुनिक कला आणि हस्तकला यांसारख्या अनेक कलाप्रकारांचे प्रदर्शन केले जाते, ज्यामुळे प्रेक्षकांना समकालीन भारतीय कलेच्या वैविध्यपूर्ण जगाची झलक अनुभवता येते.
३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून कला संग्राहक व विशेष आमंत्रितांसाठी प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले असून, प्रदर्शन ३१ जानेवारी व 1 फेब्रुवारी असे दोन दिवस सर्वसामान्य रसिकांसाठी खुले राहील.
या वर्षीच्या कला महोत्सवात ४५ कला दालनं, स्टुडिओज व आर्टिस्ट कलेक्टिवज सहभागी होत असून ५५० कलाकारांच्या ४,५०० हून अधिक कलाकृती तब्बल १५० दालनांमधून सादर केल्या जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रकार-शिल्पकार व त्यांच्या कलाकृती एकाच मंचावर पाहण्याची पर्वणी कलाकार, संग्राहक आणि कला रसिकांसाठी आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी मुंबई, दिल्ली, बंगलोर व हैदराबाद या शहरांमध्ये घेवून येत असतो व कलावंत देखील महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात..
२००८ साली स्थापन केलेल्या इंडिया आर्ट फेस्टिव्हलची संकल्पना ग्रामीण आणि निमशहरी भागांतील कलाकारांना एकत्र व मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आली होती. कालांतराने हा उपक्रम एका सशक्त राष्ट्रीय कला चळवळीत रूपांतरित झाला असून, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख सांस्कृतिक केंद्रांमध्ये उदयोन्मुख कलाकारांना कलासंग्राहक व रसिकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तो करीत आहे.
याविषयी बोलताना इंडिया आर्ट फेस्टिव्हलचे संस्थापक राजेंद्र पाटील म्हणतात,“इंडिया आर्ट फेस्टिव्हलची संकल्पना ही एक सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून करण्यात आली होती. कलाकारांना थेट दर्शकांशी संवाद साधता येईल व आपल्या कलाकृतींना चित्रखरेदीदार वर्गापर्यन्त पोहचविता असा त्यामागे दुहेरी हेतु होता.’
मुंबई २०२६ आवृत्तीत सहभागी दालनांमध्ये मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, उदयपूर, शांतिनिकेतन, गोवा, नागपूर व पुणे यांसह देशभरातील कलादालनं, तसेच सिंगापूर, दुबई आणि झ्युरिख (स्वित्झर्लंड) येथील कला दालनांचा आंतरराष्ट्रीय सहभागी पाहायला मिळतो.
आर्टिस्ट्स पॅव्हिलियनमध्ये स्वतंत्र कलाकारांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत असून त्यात ओम थाडकर, अंजली प्रभाकर, राजीव राय, कविता सचदेव, प्रविणा पारेपल्ली, धनश्री वझलवार, अशोक राठोड, कांचन महंते, शुभांगी जांगडे, एम. नारायण, शोभिता हरिहरन, अनिल वर्गीस, अरुल मुरुगन, रिया दास, सीमा गुप्ता, महेश सौंदत्ते, रुता इनामदार, युवराज पाटील, दीपा नाथ, पियाली सरकार, देव मेहता, राहत काझमी, विनीत कुमार, अॅना कुरियन, रुपाली मन्सिंगका, लक्ष्मी सुकुमारन, अंजुम शाह, चांदनी गुलाटी अग्रवाल, उमा कृष्णमूर्ती आदींसह शेकडो कलाकार सहभागी आहेत.
गॅलरी सादरीकरणांमध्ये आधुनिक कलेतील दिग्गज आणि समकालीन कलाकारांची प्रभावी सांगड पाहायला मिळेल. यामध्ये एम. एफ. हुसेन, कृष्णेन खन्ना, जोगेन चौधरी, अकबर पदमसी, अंजोली एला मेनन, परेश मैती, मनु पारेख, अतुल दोडिया, टी. वैकुंठम, लालू प्रसाद शॉ, माधवी पारेख, लक्ष्मा गौड, जतिन दास आदींच्या कलाकृतींचा समावेश आहे. यामुळे संग्राहकांना एकाच ठिकाणी नामवंत तसेच उदयोन्मुख कलावंतांच्या कलाकृती एकाच व्यासपीठावर पाहण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.
अॅटली यांच्या AA22XA6 ची सर्वत्र चर्चा! दीपिका पादुकोण ‘या’ सिनेमात मुख्य भूमिकेत
२०२६ मध्ये मुंबईत पुनरागमन करताना, इंडिया आर्ट फेस्टिव्हल भारताच्या विकसित होत असलेल्या कलापरिसंस्थेत एक प्रेरक घटक म्हणून आपली भूमिका पुन्हा अधोरेखित करून, सर्वसमावेशकता आणि सर्जनशील देवाणघेवाणीची परंपरा पुढे नेत आहे.
ब्रिजस्टोन इंडियाची पंजाबी स्टार परमिश वर्मासोबत भागीदारी! आता रंगेल खरी मैफिल






