घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप : भीमसैनिकांचा तीव्र निषेध
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या शासकीय समारंभात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराविरोधात वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव यांनी तीव्र आक्षेप घेत सार्वजनिक निषेध नोंदवला असून, या घटनेचे पडसाद धाराशिव जिल्ह्यात उमटले आहेत.
या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील भीमसैनिकांनी एकत्र येत माधवी जाधव यांना संविधानिक संरक्षण देण्यात यावे, तसेच गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली आहे. यासंदर्भात मंगळवारी (२७ जानेवारी) जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रजासत्ताक दिनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय उत्सवात शासकीय समारंभाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न करणे ही जाणीवपूर्वक केलेली कृती असून, त्यामुळे संपूर्ण आंबेडकरवादी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. संविधानाचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांचा अवमान झाल्याची भावना समाजात निर्माण झाली असून, या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणास जबाबदार धरून गिरीश महाजन यांची तात्काळ पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करावी, तसेच निषेध व्यक्त केल्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता असलेल्या माधवी जाधव यांना संविधानिक व कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर धनंजय वाघमारे, बाबासाहेब बनसोडे, अंकुश उबाळे, पांडुरंग आष्टे, सुखदेव बनसोडे, संपत शिंदे, गणेश वाघमारे, स्वराज जानराव, भालचंद्र बनसोडे यांच्यासह अनेक भीमसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणामुळे निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. नाशिकमधील एका सरकारी कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव वगळल्याने वाद निर्माण झाला. या कार्यक्रमादरम्यान एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीर निषेध केला, ज्यामुळे राज्यभर राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या.
नाशिकमधील एका सरकारी कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणानंतर वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नोत्तरामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले. या कारवाईनंतर, नागरिक पोलिस ठाण्याबाहेर जमले आणि त्यांनी मंत्री महाजन यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली आणि तक्रार दाखल करण्याची मागणी केली.






