( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘इंडियन आयडॉल‘चा पहिला विजेता आणि लोकप्रिय गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा त्याच मंचावर झळकणार आहे. सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडॉल’च्या आगामी वीकेंड स्पेशल भागात अभिजीत विशेष पाहुणा म्हणून उपस्थित राहणार असून त्याचा खास परफॉर्मन्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरल्यानंतर अभिजीत सावंतने संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक सुपरहिट गाणी आणि दमदार लाइव्ह परफॉर्मन्समुळे तो आजही प्रेक्षकांचा लाडका गायक आहे. आता पुन्हा त्याच मंचावर परतल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
नुकताच या विशेष भागाचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. त्यामध्ये अभिजीत सावंतची एंट्री आणि त्याचा परफॉर्मन्स पाहून चाहते आनंद व्यक्त करत आहेत. ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर त्याचे पुनरागमन हा या सीझनमधील खास क्षण मानला जात आहे.
या अनुभवाबद्दल बोलताना अभिजीत सावंत म्हणाला, “इंडियन आयडॉलसारख्या मंचावर पुन्हा जाणं माझ्यासाठी खूप खास आहे. पहिला विजेता म्हणून सुरू झालेला प्रवास आणि आज विशेष पाहुणा म्हणून त्याच मंचावर उभं राहणं ही अतिशय सुखद भावना आहे. ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर पुन्हा जाणं म्हणजे घरी परतल्यासारखं वाटतं. जिथून माझ्या संगीत प्रवासाची सुरुवात झाली, त्या मंचावर पुन्हा येणं आणि नव्या गायकांच्या सादरीकरणाचा आनंद घेणं हा अविस्मरणीय अनुभव आहे.”
संगीत क्षेत्रात आजही ट्रेंडसेटर म्हणून ओळख असलेल्या अभिजीत सावंतने नव्या पिढीतील श्रोत्यांमध्येही आपली लोकप्रियता कायम राखली आहे. आगामी काळात तो विविध संगीत प्रकल्प आणि नव्या उपक्रमांमधून चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची माहितीही समोर आली आहे.






