फोटो सौजन्य - Social Media
मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार विशेष ठरले. ‘मुक्काम पोस्ट बॉम्बीलवाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच ‘हमसफर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा, तर ‘भंगार’ या मराठी-इंग्रजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारांमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे.
हिंदी विभागात ‘श्रीकांत’ या चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला. अभिनेत्री यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर दिग्दर्शक आनंद एल. राय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. प्रादेशिक चित्रपटांच्या विभागातही विविध भाषांतील चित्रपटांनी आपली छाप पाडली. तेलुगूतील ‘कमेटी कुल्लू’, तमिळमधील ‘रायन’, मल्याळममधील ‘फेमिनिची फातिमा’, कन्नडमधील ‘मिथिया’, ओडिया भाषेतील ‘लहरी’ तसेच हिंदीतील ‘श्रीकांत’ या चित्रपटांनी संबंधित विभागात पुरस्कार पटकावले.
तांत्रिक विभागातही अनेक चित्रपटांचा गौरव झाला. ‘स्त्री 2’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. ‘पुष्पा 2’ला वेशभूषा, ‘कल्कि 2898 AD’ला प्रॉडक्शन डिझाइन, तर ‘भूल भुलैया 3’ला सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. याशिवाय विविध तांत्रिक आणि सर्जनशील विभागांतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनाही राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला होता. विविध भारतीय भाषांमधील चित्रपटांचे परीक्षण करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी दर्जेदार चित्रपट, प्रभावी अभिनय आणि उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीचा गौरव करत भारतीय चित्रपटसृष्टीच्या वैविध्यपूर्ण परंपरेला सलाम केला.






