Priyanka Chopra Varanasi First look (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली. दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या महत्त्वाकांक्षी वाराणसी चित्रपटातून तिचा पहिला अधिकृत लूक समोर आला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हा लूक प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आल्याने चाहत्यांसाठी ही आनंदाची दुहेरी भेट ठरली.
राजमौली यांनी स्वत: त्यांच्या सोशलमीडिया अंकाउंटवर प्रियांकाचे दोन वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर केलें. दोन्ही छायाचित्रांमध्ये तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन भिन्न बाजू पाहायला मिळतात. एक फोटोमध्ये ती गंभीर, आत्मविश्वासापूर्ण आणि धाडसी रुपात दिसते. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर आनंदी हास्य आणि उत्साही स्वभाव झळकताना दिसतो. या दोन वेगळ्या भावछटा पाहून चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात प्रियांका ‘मंदाकिनी’ हे महत्त्वाचे पात्र साकारत आहे. तिच्या भूमिकेची फारशी माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी पोस्टरवरून हे पात्र कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तिच्या लूकमध्ये पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा सुरेख मिलाफ दिसून येतो.
फोटो शेअर करताना राजामौली यांनी प्रियांकाच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करणारे काही शब्द लिहिले. त्यांच्या मते, तिच्या चेहऱ्यावरचे हास्य जितके आकर्षक आहे, तितकीच ती गंभीर मुद्रेत प्रभावी आणि ताकदीची वाटते. या छोट्याशा संदेशानेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘वाराणसी‘ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या पात्राची ओळख आधीच समोर आली असून, ते भगवान शिवाचे भक्त असलेल्या एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. काही प्रसंगांमध्ये त्यांचा वेगळा अवतारही पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
चित्रपटाची कथा, कलाकारांची निवड आणि राजामौली यांचे दिग्दर्शन या तिन्ही गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’सारखे भव्य चित्रपट दिल्यानंतर राजामौली यांच्या प्रत्येक नव्या प्रकल्पाकडे देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष असते. त्यामुळे ‘वाराणसी’कडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
Salman Khan : सलमान खानच्या हस्ते घरांच्या चाव्या, झोपडपट्टीधारकांच्या आयुष्यात नवी सुरुवात
प्रियांका चोप्रासाठीही हा चित्रपट खास मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केल्यानंतर ती पुन्हा भारतीय प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या व्यक्तिरेखेची मांडणी कशी असेल, याबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
सध्या सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकवर हजारो प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी तिच्या स्क्रीन प्रेझेन्सचे कौतुक केले आहे, तर काहींनी हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाला अजून वेळ असला तरी कलाकारांचे लूक, पोस्टर्स आणि छोट्या झलकांमुळे वातावरण आधीच रंगले आहे. आता पुढे चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर कधी प्रदर्शित होणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






